लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला आज, १२ मेपासून सुरुवात होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात हजारो भाविकांचा मेळा शिरगावात दाखल होणार आहे.
जत्रोत्सवानिमित्त देवीचे धोंड व्रत स्वीकारून उपवास व सोवळे पालन करून मंगलमय वातावरणात देवीची भक्ती करतात. सध्या संपूर्ण डिचोली तालुका सोवळ्यात मंगलमय वातावरणाने प्रसन्न बनलेले आहे. शनिवारी धोंड गणांनी व्होडले जेवण करून गावातील लोकांनाही या उत्सवात सहभागी करून घेताना फराळ दिला.
दरम्यान, पाच दिवस अलिप्त राहून सोवळे पालन हा विलक्षण अनुभव असल्याचे व डिचोली येथील शेखर नाईक, संजय आरोलकर नवनाथ नाईक यांनी सांगितले. लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ही सोवळे पालन करून अग्निदिव्यासाठी सज्ज होत असतात.
देवस्थान समिती प्रशासन व इतर माध्यमातून शिरगावात जत्रेसाठी घरोघरी रंगरंगोटी, सजावट कमानी उभारणे तसेच दुकाने लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाच दिवस भाविकांची मांदियाळी शिरगावात असल्याने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली.
होमकुंड पूर्ण
अग्निदिव्य साकारण्यासाठी होमकुंड रचून शनिवारी रात्री पूर्ण करण्यात आले आहे. १२ रोजी मध्यरात्री अग्निदिव्य साकारण्यासाठी धोंड सज्ज झाले आहेत. हजारो व्रतस्थ धोंड अग्निदिव्य साकारतात आणि हा सोहळा पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अग्निदिव्य लोकांना योग्य पद्धतीने पाहता यावे, यासाठी विशेष नियोजन देवस्थान समिती व प्रशासनाकडून केले आहे.