पणजी : विदेश व्यापार महासंचालनालयाचे गोव्यातील विभागीय कार्यालय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बंद केले आहे. येथे आता केवळ विस्तार कक्ष चालू राहणार आहे. या विभागीय कार्यालयात पुरेसे काम नव्हते या सबबीखाली ते मुंबई कार्यालयात विलीन करण्यात आले आहे. गोव्यातील या विभागीय कार्यालयाबरोबरच अमृतसर आणि पुडुचेरी विभागीय कार्यालयेही बंद करुन अनुक्रमे लुधियाना व चेन्नई येथे विलीन केलेली आहेत.
विभागीय कार्यालयांमध्ये जेवढे काम अपेक्षित आहे तेवढे येथे होत नसल्याचे आढळून आले. विदेश व्यापारविषयक व्यवहाराचे प्रमाण कमी असल्याने ही कार्यालये बंद करावी लागली आहेत. असे असले तरी जेथे विभागीय कार्यालये बंद करण्यात आली आहेत तेथे विस्तार कक्ष उघडण्यात येतील. जेणेकरुन आयात, निर्यातीबाबत काही तातडीचे प्रश्न असल्यास ते या विस्तार कक्षाच्या माध्यमातून निकालात काढता येतील.
या संचालनालयाचे मुख्यालय दिल्लीत असून देशातील निर्यात वाढविण्याच्या दृष्टिने विदेश व्यवहार धोरण तयार करणे तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत हे संचालनालय महत्त्वाची कामगिरी बजावते. देशभरातील ३८ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून निर्यातदारांचे प्रश्न हे संचालनालय हाताळत असते.
जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत निर्यातदारांना सर्व विभागीयर कार्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात. ‘नॅशनल कॉन्सिल फॉर मायक्रो, स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्रायझेस’चे चेअरमन मांगिरीश रायकर म्हणाले की, ‘विभागीय कार्यालय बंद केल्याने गोव्यातील निर्यातदारांची गेला महिनाभर फार कुचंबणा झालेली आहे. गोव्यातून मासळी, काजू मोठी निर्यात होते. ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी गोव्यात विभागीय कार्यालयाची अत्यंत गरज आहे. या संदर्भात मी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला पत्र पाठवले असून कार्यालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली आहे.’