लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात वादाच्या घेऱ्यात सापडलेले गोव्याचे पोलिस महासंचालक डॉ. जसपाल सिंग हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या बदलीची चर्चा असताना ते दिल्लीत गेल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत.
डीजीपी सिंग यांची गोव्यातून इतरत्र बदली करण्याची शिफारस यापूर्वीच राज्य सरकारने केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीजीपी सिंग यांच्या बदलीचा आदेश कोणत्याही क्षणी जारी होऊ शकतो. नवीन डीजीपीसाठीही चाचपणी सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांचे मोबाइल कॉल डिटेल्स घेण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे. हे कॉल डिटेल्स डीजीपींच्या कार्यालयाला सादर केले जाणार आहेत.
एसआयटीला हवे पूजा शर्माचे मोबाइल डिटेल्स
पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी पणजी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या अर्जाला एसआयटीने तीव्र हरकत घेतली आहे. एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात पूजा शर्माची चौकशी किती गरजेची आहे हे सांगितले. ज्या बाऊन्सरनी घर पाडले त्यांचा पूजा शर्माशी काय संबंध आहे, याची माहिती घेण्यासाठी तिची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. दि. ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.