पणजी: आसगाव येथील आगरवाडेकर कुंटुंबियांचे घर १० मिनिटात पाडा अन्यथा गंभीर परिणामांस तयार रहा असे म्हणत गोवा पोलिस महासंचालक (डीजीपी)जस्पाल सिंग यांनी आपल्यावर दबाव टाकला होता अशी जबानी हणजूणचे पोलिसस्थानकाचे निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी हणजूण पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात नोंद करीत बॉम्ब टाकला आहे.
सदर अहवाल हा हणजूण पोलिसांनी मुख्य सचिव व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांना सादर केला आहे. खुद्द पोलिस निरीक्षकांनीच ही जबानी दिल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पोलिस महासंचालक जस्पाल सिंग यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर मुंबई येथील गुप्तचर अधिकारी पूजा शर्मा व अरशद ख्वाजा यांनी पाडले. मात्र घर पाडताना हणजूण पोलिस तेथे उपस्थित असूनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हणजूण पोलिस रडारवर आले होते. यानंतर हणजूणचे पोलिसस्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई व अन्य दोन पोलिस निरीक्षक संकेत पोखरे व नितीन नाईक यांना सेवेतून निलंबित केले आहे.