फोंडा : ढवळी येथील एका मोठ्या स्क्रॅप यार्डला वाढला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण भंगारअड्डा आगीच्या भक्षस्थानी पडला असून ,मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. गोव्यातील सर्व अग्निशामक दलाचे बंब आणून आग आटोक्यात आणण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न चालू होते. कवळे पंचायत क्षेत्रातील ढवळी येथे किमान 20 भंगार अड्डेआहेत .येथील एका मोठ्या स्क्रॅपला यार्ड ला साडेबाराच्या दरम्यान आग लागली.
आग लागण्याचे नक्की कारण समजले नसून दुपारच्या वेळी आग लागल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले व चारी बाजूंनी आतमधील सामान पेटायला लागले. सदर भंगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक बॅरल्स, प्लास्टिक पाईप्स व इतर प्लास्टिक सामानाचा समावेश असल्याने आगीने लगेचच पेट घेतला व संपूर्ण स्क्रॅपयार्डला आगीने कवेत घेतले.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.परंतु आगीचे भयानक स्वरूप पाहताच त्यांनी इतर बंब मागवायला सुरुवात केली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की खास संचालक नितीन रायकर, विभागीय उपसंचालक राजेंद्र हळदणकर इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्क्रॅपच्या ठिकाणी धाव घेतली. अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी फळदेसाई, निरीक्षक विजयकुमार चोडणकर, वाहतूक निरीक्षक कृष्णा सिनारी सुद्धा त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते.
आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर यांनी सुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली व परिसरातील सर्व भंगार अड्डे आठ दिवसाच्या आत खाली करण्यात येतील असे आश्वासन दिले.
सदर भंगार अडूड्या विरुद्ध कवळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत वारंवार आवाज उठवला जातो. स्थानिक प्रशासनाने अनेक वेळा भंगार अड्ड्यावर नोटिसा सुद्धा बजावल्या आहेत. परंतु भंगार अड्डे वाल्यांनी व काही जमीन मालकांनी त्याविरुद्ध न्यायालयातून स्थगिती आणल्याने भंगार अड्डे आहे तसेच या भागात आहेत. मुख्य म्हणजे भंगार अड्ड्यातच गॅस सिलिंडर वापरून कामगार जेवण वगैरे करतात जे अत्यंत धोकादायक आहे. मागच्याच आठवड्यात सरपंच व इतर पंच सदस्यांनी भंगार अड्ड्याची पाहणी करून सदर मालकांना ताकीद दिली होती.
आग आटोक्यात येत नाही ते लक्षात येताच मडगाव, वास्को ,कुंडई, डिचोली,पणजी, ओल्ड गोवा ,वाळपाई या भागातील बंब मागवण्यात आले. चोहोबाजूंनी पाण्याचा फवारा मारण्याचे चालू असताना आग मात्र दुमसत राहिली व रौद्ररूप धारण करत राहिली .शेवटी अग्निशामक दलाने पणजी येथील हायड्रोलिक क्रेन आणून वरून पाण्याचा फवारा मारून पाहिले. तरी आग दुमसतच होती.
सदर आगीत भंगार अड्डा पूर्णपणे बेचिराख झाला असून नुकसानीचा अंदाज आग आटोक्यात आल्यानंतरच करण्यात येईल. परंतु प्राप्त परिस्थितीनुसार भंगार अड्डा मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
बाजूलाच पेट्रोल पंप:
सदर भंगार अड्ड्याच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे. मागचे काही दिवस सदर पेट्रोल पंप बंद आहे. जर आग लागली त्यावेळी पेट्रोल साठा सदर पेट्रोल पंप वर असता तर अनर्थ झाला असता .आग लागल्यानंतर भंगार अड्ड्या समोर उभ्या करून ठेवलेली वाहने सुद्धा बेचिराख झाली आहेत. त्यात एक ट्रक व एका रिक्षा प्रथमदर्शनी आगीत भस्मसात झाल्याचा पुरावा मिळत होता.