लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मंगळवार (दि. १४) रात्री व संपूर्ण बुधवारी यादिवशी झालेल्या विविध पडझडीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. तर मुळगाव येथे झाड पडल्याने एक स्कूटर चालक जखमी झाला. सुदैवाने थोडक्यात बचावला.
मये आणि डिचोली येथे दोन कार गाड्यांवर मोठे वृक्ष पडल्याने मोठे नुकसान झाले. सुमारे दहा ते बारा ठिकाणी पडझड झाल्याने तसेच वाहनांची हानी झाल्याने पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, डिचोली अग्निशामक दल कार्यालयातून देण्यात आली. कुंभारवाडा येथे उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच बोर्डे येथे विपुल गडेकर यांच्या कारवर वृक्ष पडल्याने नुकसान झाले. पाळी, डिचोली मुळगाव नावेली, कारापूर येथे झाड पडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
बुधवारी सकाळी मुळगाव येथे वृक्ष पडल्याने दुचाकीस्वार रहमान पाशा जखमी झाला. झाड पडले त्या वेळेला वाहने ये-जा करत होती. मात्र सुदैवाने अनर्थ टळला. या दरम्यान काही वेळ वाहतूक ठप्प झाली. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यस्त असूनही घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा केला.
अग्निशामक दलाचे जवान मंगळवार सायंकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंत अविश्रांत मदत कार्यात गुंतलेले होते. अनेक ठिकाणी वृक्ष पडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अग्निशामक दलाचे फायर स्टेशन ऑफिसर संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नायक, विठ्ठल गाड, रामदास परब, सुनील गावस, सागर कुंकळ्ळकर, आदित्य गावस, प्रदेश मोहन, अनुप नाईक, महेश नाईक, कपिल गावस, संजय उसपकर, नीलेश होळकर, गौरव नाईक आदी अग्निशामक दलाचे जवान मदत कार्यात गुंतलेले होते.