- गोवा संघ कार्यकारणिने प्रांताला सुनावले खडे बोल
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३१ - सत्तेच्या दलालाशी तुम्ही सौदा केलात का? तत्वे सत्ताधिशांना विकलीत काय? संघातून भाजपात गेल्यावर तत्वहीन आणि सत्त्वहीन झालेल्या नेत्यांना खाली उतरा म्हणून सांगण्याचे धाडस हरवून बसलात काय? अशा प्रश्नांचा भडिमार करून गोव्याच्या संघ कार्यकारणीच्या संतप्त पदाधिका-यांनी प्रांत कार्यकारणीच्या प्रतिनिधींकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच वेलिंगकर यांच्या जागी दुस-या संघचालकांची घोषणा करूनच दाखवा असे आव्हानही दिले. वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी करण्याचा आदेश कोकण प्रांत कार्यकारणीने दिला होता.
वेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढून टाकल्यानंतर गोवा संघात प्रक्षोभ निर्माण झाला असून कार्यकर्ते संतापलेले आहेत. कार्यकर्त्यांनी आपला राग प्रांताच्या प्रतिनिधींवर काढला. बुधवारी संध्याकाळी संघाच्या दोन्ही जिल्हा व तालुका कार्यकारणीच्या पदाधिका-यांची कार्यकारणीची बैठक कुजिरा-बांबोळी येथील हेडगेवार विद्यालयाच्या सभागृहात झाली. सुनिल सप्रे, दादा गोखले, सुमंत आमशेकर हे प्रांताचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. वेलिंगकर यांना पदावरून हटविण्याची केलेली कारवाई मागे घ्या अन्यथा परिणामांला तयार रहा असा इशारा देतानाच त्यांच्या जागेवर प्रांत कार्यकारणीने दुस-या संघचालकांच्या नावाची घोषणा करूनच दाखवावेच असे आव्हानही दिले.
बंद सभागृहात झालेल्या या बैठकीला ४०० प्रमुख कार्यकर्ते सहभागी होते. त्यापैकी १०० कार्यकर्ते बोलले आणि सर्वांनी प्रांताच्या निर्णयाचा निषेध केला. सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले आणि प्रमुख कार्यकर्तेही या बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सामुहिक राजीनाम्याची तयारी
सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून हटविल्यामुळे संतापलेल्या तालुका, जिल्हा आणि विभाग पदाधिका-यांनी सामुहिक राजीनाम्याचीही तयारी ठेवली आहे. हे वृत्त मंगळवारी उशिरा समजले तेव्हाच सामुहिक राजीनामा देण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. बुधवारी कुजिरा येथे झालेल्या बैठकीत त्याची माहिती प्रांताच्या प्रतिनिधींना देण्यातही आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतिम निर्णय गुरुवारी जाहीर केला जाणार आहे.