लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीअंतर्गत राजधानी पणजीत इलेक्ट्रिक बससेवेला सुरुवात झाली आहे. मात्र, यामुळे सध्या शहरात डिझेलवर धावणाऱ्या खासगी बसेस बंद होणार नाहीत. खासगी बसमालकांच्या व्यवसायावर गदा येणार नाही, त्यांनी चिंता करू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत कदंब - महामंडळातर्फे इलेक्ट्रिक बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर, सांताक्रुझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात सहा बस सुरू केल्या असून, त्यानंतर १५ दिवसांनी या बसची संख्या वाढवली जाईल. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने सुरू करून प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार प्रत्येक क्षेत्रात सातत्याने नवनवीन गोष्टी करीत आहे. पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस सुरू केल्या आहेत. शहरात एकूण ४८ इलेक्ट्रिक बस धावतील. त्यातील पहिल्या टप्प्यात सहा बसची सेवा सुरू झाली आहे. या बस सुरू झाल्या म्हणून शहरात डिझेलवर धावणाऱ्या खासगी बस बंद होणार नाहीत. या खासगी बसना पर्यायी मार्ग दिले असून, ते त्यावर कार्यरत असतील. पारंपरिक बस व्यवसायात असलेल्या खासगी बसमालकांच्या व्यवसायावर गदा आणणे हा सरकारचा हेतू नाही. त्यांनी चिंता करू नये. त्यांना जर काही समस्या असेल, त्यांनी माझ्याशी येऊन चर्चा करावी. नक्कीच मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात 'माझी बस' योजनेला गती देणार
कदंब महामंडळाची माझी बस योजना ही अधिक सशक्त केली जाईल. सध्या या योजनेंतर्गत ५६ खासगी बस कार्यरत असून, आणखी बसमालक या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. नागरिकांना चांगली वाहतूक सेवा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी भविष्यात ई रिक्षा, ई बाइकचा सुद्धा सार्वजनिक वाहतूक सेवेत समावेश करण्यावर भर असेल. यामुळे प्रदूषणही कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.