पणजी : म्हादई पाणीतंटाप्रश्नी गोवा सरकारमध्ये मोठे मतभेद असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादई म्हणजे आमची आई असून म्हादईच्या पाण्याचा एक देखील थेंब कर्नाटकला दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपाचे कर्नाटकचे नेते येडीयुरप्पा यांना पाठविलेल्या पत्राविषयी आपल्याला काहीच ठाऊक नसून तो राजकीय स्टंट असू शकतो, असेही विधान पालयेकर यांनी केले. आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पर्रीकर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
कर्नाटकमध्ये म्हादई पाणीप्रश्नी वाद पेटला आहे. तेथील भाजपाच्या नेत्यांना कर्नाटकमधील शेतक-यांनी हैराण केले आहे. गोव्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रतही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एवढी वर्षे आम्ही कर्नाटकविरुद्ध पाणीप्रश्नी लढा दिला. आता आम्ही म्हादईचे पाणी का म्हणून कर्नाटकला द्यावे अशी विचारणा म्हादईचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.
जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी आपली आणि गोवा फॉरवर्डचीही भूमिका बुधवारी स्पष्ट केली. मंत्री पालयेकर यांनी प्रथमच जाहीरपण वृत्त वाहिन्यांसमोर आपली भूमिका मांडताना एक थेंब देखील पाणी कर्नाटकला देता येणार नाही हे स्पष्ट केले. आपण जलसंसाधन खात्याचे मंत्री असून आपल्याकडे कसलेच पत्र कुणी पाठवलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी कसले पत्र पाठवले आहे ते तुम्ही त्यांना विचारा. तो त्यांचा राजकीय स्टंट असू शकतो, असे मंत्री पालयेकर म्हणाले.
म्हादई नदीचे पाणी आम्हाला सांभाळून ठेवायचे आहे. आम्हाला गोव्याची गरज अगोदर पहायची आहे. म्हादई म्हणजे आमची जीवनदायिनी आहे. आम्ही एक थेंब देखील कर्नाटकला देऊ शकत नाही. ही जलसंसाधन खात्याचे मंत्री या नात्याने माझी भूमिका आहेच. शिवाय माङया गोवा फॉरवर्ड पक्षाची आणि पक्षनेते मंत्री विजय सरदेसाई यांचीही हीच भूमिका आहे, असे मंत्री पालयेकर यांनी नमूद केले. मी आणि आमचा पक्ष म्हादईप्रश्नी काहीच तडजोड करणार नाही. आमचे लोक पाण्यासाठी तरसत आहेत. म्हादईचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकला देणे हे आम्हाला बरोबर वाटत नाही आणि आम्ही तरी एक थेंब देखील देणार नाही एवढी स्पष्ट आमची भूमिका आहे, असे मंत्री पालयेकर म्हणाले.
दरम्यान, मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांची भूमिकाही गोवा सरकारने तडजोड करू नये अशीच आहे. ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी देखील आपले व्यक्तीगत मत हे म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ नये असेच असल्याचे सांगितले. एवढी वर्षे आम्ही कायद्याची लढाई लढत आलो आहोत मग, आता का म्हणून आम्ही तडजोड करावी असा प्रश्न डिसोझा करतात.