पणजी : कारवार, सिंधुदुर्गातून तासाभरात गोव्यात पोहोचणा-या मासळीबाबत वेगळा विचार शक्य असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. परंतु लांबहून येणा-या मासळीच्या बाबतीत मात्र एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कठोरपणे करावे लागेल. मासळी आयात निर्बंधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.कर्नाटकी आमदारांच्या एका शिष्टमंडळाने उडुपी तसेच तेथील स्थानिक मच्छिमारांसोबत काल सभापती प्रमोद सावंत, मच्छिमारमंत्री विनोद पालयेंकर व मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेऊन गोव्याच्या हद्दीवर सरसकट सर्वच मासळी वाहने अडविली जातात, अशी तक्रार केली. एफडीएकडे नोंदणी तसेच इन्सुलेटेड असलेली वाहनेही परत पाठवली जातात, असे त्यांचे म्हणणे होते. काही मासळी फिश मिलसाठी तसेच मुरगाव बंदरातून निर्यातीसाठी गोव्यात येते. ही मासळीही अडविली जाते. कारवारसारख्या गोव्यापासून अगदी जवळ असलेल्या ठिकाणाहून तासाभरात गोव्यात मासळी पोहोचते. या लहान मासळी विक्रेत्यांनाही हे निर्बंध लागू केलेले आहेत ते अयोग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.या शिष्टमंडळात कारवारच्या भाजपा आमदार रुपाली नाईक तसेच इतरांचा समावेश होता. विश्वजित हे राज्याबाहेर होते त्यामुळे सभापतींनी त्यांच्याशी नंतर फोनवर संपर्क साधला. या प्रतिनिधीशी बोलताना विश्वजित म्हणाले की, गोव्यातील जनतेच्या आरोग्याला माझे प्राधान्य आहे. अन्न व औषध प्रशासन मार्गदर्शक तत्त्वांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. एफडीएकडे नोंदणी आणि इन्सुलेटेड वाहनांचा वापर सक्तीचा असून जो कोणी मासळी वाहतूकदार या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करील त्यालाच प्रवेश दिला जाईल. शेजारी सिंधुदुर्ग किंवा कारवारमधून मासळी विकण्यासाठी गोव्यात येणा-या विक्रेत्या आहेत. तासाभरात जी मासळी गोव्यात पोहोचते त्या मासळीबाबत वेगळा काही विचार करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. संबंधित अधिकारी तसेच घटकांशी चर्चा विनिमय करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. परंतु त्याचबरोबर लहान मासळी व्यापा-यांना दिलेल्या सवलतीचा मोठे व्यापारीही गैरफायदा घेऊ शकतात. याबाबतही खबरदारी घ्यावी लागेल.
कारवार, सिंधुदुर्गातून तासाभरात पोहोचणाऱ्या मासळीबाबत वेगळा विचार शक्य : आरोग्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 7:39 PM