पणजी : राजधानी पणजीतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलच्या वेगवेगळ्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरफरक केवळ १५ पैशांचा असला, तरी पेट्रोल-डिझेल विक्रीतून दिवसाकाठी होणारी उलाढाल पाहता, ही रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे. जुन्या सचिवालयाजवळ मांगिरीश सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंपच्या इंडिकेटरवर बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या प्रतिनिधीने भेट दिली असता, साध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर ५६.0६ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर ४६.४१ रुपये इतका दाखविण्यात येत होता. येथून काही अंतरावर पाटो पुलाखाली असलेल्या पेट्रोल पंपवर हेच दर होते. हे दोन्ही पंप हिंदुस्थान पेट्रोलियमचे इंधन विकतात. येथून काही अंतरावर फेरीबोट धक्क्यासमोरील कंटक पेट्रोल पंपवर तसेच डॉन बॉस्को हायस्कूलजवळील ठाकूर पेट्रोल पंपवर मात्र साध्या पेट्रोलचा दर ५६.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ४६.४४ रुपये प्रति लिटर इतका होता. हे दोन्ही पेट्रोल पंप भारत पेट्रोलियमचे इंधन विकतात. डिझेलच्या दरातही तीन पैशांचा फरक आहे. बसस्थानकाजवळील इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या हिरा पेट्रोल पंपवर साध्या पेट्रोलचा दर ५६.११ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ४६.४५ रुपये प्रति लिटर इतका होता. एकाच शहरात अवघ्या काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपांवरील दरफरकामुळे ग्राहकही चक्रावले आहेत. याचा अनुभव डॉक्टर तथा आघाडीचे सूत्रनिवेदक अजय वैद्य यांनाही आला. वैद्य म्हणाले की, आपण नेहमीच ठाकूर पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतो; परंतु जुन्या सचिवालयानजीक असलेल्या मांगिरीश सर्व्हिस सेंटरच्या इंडिकेटरवर कमी दर पाहून ठाकूर पेट्रोल पंपवर विचारपूस केली असता, कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. पेट्रोलचे दर पंपगणीक बदलतात की विभागणीक, हे लोकांना समजायला हवे. शहरात अवघ्या काही अंतरावर असलेल्या पंपांवर तब्बल १५ पैशांचा दरफरक कसा काय, याचे कोडे वाहनधारकांना पडले आहे, असे ते म्हणाले. वजन माप खात्याचे मुख्य नियंत्रक व्ही. आर. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, दरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम नागरी पुरवठा खात्याचे असल्याचे स्पष्ट करून मापामध्ये खोट आढळून आली तरच आम्ही कारवाई करू शकतो, असे ते म्हणाले. नागरी पुरवठा खात्याचे संचालक विकास गावणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, वाढीव दर लावण्यात येत असल्याच्या कोणत्याही तक्रारी खात्याकडे आलेल्या नाहीत. एखाद्या पंपावर जादा दर आकारले जात असतील, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि प्रसंगी दंड ठोठावण्याचे काम तेल कंपन्याच करत असतात. (प्रतिनिधी)
राजधानीत पेट्रोल पंपांवर वेगवेगळे दर
By admin | Published: September 11, 2015 2:02 AM