सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झाले. मतदानाचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. परंतु दक्षिण गोव्यात निवडणूक निकालाची चर्चा नाक्या नाक्यावर तसेच हॉटेल्समध्ये ऐकायला मिळते. भाजप समर्थक आपला उमेदवार तर इंडिया आघाडीचे समर्थक आपला उमेदवार निवडून येणार असा दावा करीत आहेत.
परंतु काही मतदार व राजकीय विश्लेषक मात्र दक्षिणेत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणार असा दावा करू लागले आहेत. सध्या तरी या चर्चेला मात्र मोठे उधाण आले आहे. प्रत्येक मतदाराच्या मनात कोण निवडून येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. काही जण म्हणतात यावेळी सायलंट मतदान झाल्याने कोण निवडून येणार हे सांगणे खूप कठीण आहे.
राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले यांना यासंबंधी विचारले असता गोव्यात इंडिया आघाडीचा उमेदवार दक्षिणेत तर उत्तरेत भाजपचा उमेदवार निवडून येणार असे चित्र दिसून येत आहे. आपण अनेकदा ज्यावेळी लोकांजवळ चर्चा करतो त्यावेळी आपल्याला काहीजण सत्ताधारी सरकारच्या विरोधात राग असल्याने इंडिया आघाडीला मतदान केल्याचे सांगतात. काणकोण तालुक्यात जरी भाजपचा आमदार असला तरी काणकोणचे काही मतदार सरकारवर नाराज आहेत.
त्यांच्या नाराजीची कारणे वेगळी आहेत. परंतु त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले असावे, असा अंदाज आहे. काणकोण भाजपचा आमदार असला तरी त्या आमदारांच्या विरोधात मुरगावमध्ये भाजपचे माजी आमदारानेही भाजपच्या विरोधात मतदान केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे पाहिल्यास भाजपचे काही कार्यकर्ते हे आतून नाराज होते; परंतु याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.
भाजपचे काही मतदारसंघात मताधिक्य वाढेलही; परंतु दक्षिणेत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी चर्चा सध्या सुरू असल्याचे तिंबले सांगतात. सांगे मतदारसंघातूनही इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान झाले, अशी चर्चा आहे.
बाळ्ळीचे माजी सरपंच रोहिदास नाईक म्हणतात, यावेळी भाजपने प्रचार चांगला केला भाजपचा उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली; मात्र, सायलेंट मतदारांनी कुणाच्या बाजूने मतदान केले हे मात्र सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले,