गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:42 PM2019-07-17T20:42:46+5:302019-07-17T20:44:16+5:30
मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिगंबर कामत यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद
पणजी : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून दिगंबर कामत काम पाहतील हे बुधवारी स्पष्ट झाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून कामत यांची निवड अखिल भारतीय काँग्रेसने (एआयसीसी) मंजूर केली आहे.
विधानसभा अधिवेशनास गेल्या सोमवारी आरंभ झाला. मात्र काँग्रेसच्या पाच आमदारांपैकी काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष नेता कोण हे ठरत नव्हते. कुडतरीचे आक्रमक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना संधी देण्यास काँग्रेसचे अन्य आमदार तसेच काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही तयार नाही याचे संकेत गेले दोन दिवस मिळत होते. कामत हे माजी मुख्यमंत्री असून त्यांना प्रथमच विरोधी पक्षनेता होण्याची संधी मिळाली आहे.
बाबू कवळेकर यांनी अन्य नऊ आमदारांसोबत गेल्या आठवड्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिकामे झाले होते. यापूर्वीच्या काळात प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईङिान फालेरो आदींनी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून काम केलेले आहे. कामत मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते होते. पण आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विरोधी बाकावर बसणाऱ्या ज्या पक्षाकडे चाळीसपैकी दहा टक्के आमदार असतात. त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद प्राप्त होत असते. काँग्रेसचे पाच आमदार असल्याने कामत यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांना विधानसभा प्रकल्पात केबिन मिळेल व सरकारी वाहनही मिळेल. दरम्यान, कामत यांच्या निवडीला एआयसीसीने मान्यता दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सायंकाळी जाहीर केले. कामत यांना आपले पूर्ण सहकार्य व पाठींबा मिळेल असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले.