लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपने आमदार दिगंबर कामत यांचेही नाव पाठवण्याचे निश्चित केले आहे. कामत यांची मात्र केंद्रात जाण्याची इच्छा नाही. बैठकीत दिगंबर यांच्या नावाची चर्चा झाली तेव्हा कामत यानी 'मला दिल्लीला जायची इच्छा नाही. तेव्हा माझे नाव पाठवू नका. मी हायकमांडलाही तसे सांगितले आहे, मात्र, त्यावर सूद यांनी त्यांना पदाधिकाऱ्यांकडून आलेली नावे केंद्रीय नेत्यांकडे पाठवावीच लागतात, आपल्या हातात काही नाही, असे सांगितल्याची माहिती पक्ष सुत्रांनी 'लोकमत'ला दिली.
पदाधिकाऱ्यांनीच कामत यांचे नाव सूचवले होते, अॅड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, दामू नाईक यांच्याबरोबरच आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर अशी पाच नावे दिल्लीला पाठविण्याचे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी काल कोअर कमिटीची बैठक घेतली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, बाबू कवळेकर, सभापती रमेश तवडकर, दिगंबर कामत व इतर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवलेकर यांनी दक्षिण गोवा मतदारसंघात कामही सुरू केले आहे. प्रदेश सरचिटणीस दाम नाईक यांचेही नाव आहे. आता सभापती रमेश तवडकर तसेच आमदार दिगंबर कामत यांची नावेही पुढे आली आहेत. तवडकर यांच्या नावाचीही चर्चा त्यावेळी तवडकर उपस्थित नव्हते.
लोकमत'ने प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'गाव चलो अभियान'मध्ये देशभरात गोवा ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिल्या क्रमांकावर आहे. सर्व १,७२२ बूथवर हे अभियान चालणार आहे.
आता 'लाभार्थी संपर्क अभियान'
२५ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात लाभार्थी संपर्क अभियान राबवले जाणार असून, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थीशी संवाद साधला जाईल, यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आमदार दाजी साळकर हे आहेत. प्रेमेंद्र शेठ, केदार नाईक, उल्हास तुटोंकर हे आमदार या समितीवर आहेत.
काय झाली चर्चा?
सध्या कॉग्रेसकडे असलेल्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. आमदार दिगंबर कामत हे सप्टेंबर २०२२मध्ये आठ काँग्रेस आमदारांसोबत भाजपमध्ये गेले होते. त्यांना राज्य मंत्रिमंडळात अद्याप स्थान मिळालेले नाही. मात्र, लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातून त्यांना निवडून आणून केंद्रात पाठवून त्यांचे पुनर्वसन केले जाये. असे भाजपमधील एका प्रबळ गटाला वाटते.
आज दक्षिण तर उद्या उत्तर गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
भाजपच्या दक्षिण गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज, मंगळवारी दुपारी ३:३० वाजता, तर उत्तर गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उद्या, बुधवारी सकाळी होणार आहे.