लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०२७ सालीही प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येईल, असे मी म्हणत असतो. मी स्वतः मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी पूर्वी मुख्यमंत्री होतो, आता नव्याने पुन्हा मी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी मुळीच इच्छा नाही व यापुढे असणारही नाही, असे दिगंबर कामत यांनी काल, शनिवारी स्पष्ट केले.
'लोकमत'ने कामत यांना संपर्क करून सध्या चाललेल्या चर्चेविषयी मत विचारले. कामत यांनी काही दिवसांपूर्वी मडगाव येथे भाजपच्या मतदार अभिनंदन संमेलनात प्रभावी भाषण केले होते. त्या भाषणाचा चुकीचा अर्थ काहीजणांनी लावला व राजकीय वाद सुरू झाला. कामत यांनी याविषयी शनिवारी 'लोकमत'ला सांगितले की, मी माझ्या भाषणात कुणाचेच नाव घेतले नव्हते. मी गोव्यातील कोणत्याच विरोधी आमदाराविषयी बोललो नव्हतो. माझ्या भाषणाचा व्हिडीओ तुम्ही काढून पहा. माझे भाषण ऐका, मी कुठेच गोव्याचा संदर्भ किंवा गोव्यातील आमदारांचा संदर्भ भाषणात दिलेला नाही.
दरम्यान, कामत म्हणाले की, देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १९ खासदार मिळाले व भाजपला सर्वांत जास्त खासदार लोकांनी दिले. तरीदेखील विरोधकांमधील काहीजणांना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडतात, असे मी भाषणात म्हणालो होतो. मी गोव्यात २०२७ साली विरोधकांपैकी कुणी आमदार मुख्यमंत्री होऊ पाहतो, असे म्हणालो नव्हतो. तसे कुणा विरोधी आमदाराचे नाव वगैरे घेऊन बोलणे हा माझा स्वभावच नव्हे.
मुख्यमंत्री सावंत यांनाच माझा पाठिंबा
तुम्ही मुख्यमंत्री पदावर यापुढे कधी दावा करणार नाही का? असे 'लोकमत'ने विचारले असता, कामत म्हणाले की, मी दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. मी भाजपमध्ये असल्याने माझा पाठिंधा मुख्यमंत्री सावंत यांना आहे. मी मुख्यमंत्री होण्याचा टप्पा आता राहिलेलाच नाही. तो टप्पा मी कधीच पार केला आहे. मी पूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होतो, आता पुन्हा तो टप्पा गाठण्याचा प्रश्नच नाही. मला ती इच्छादेखील नाहीं. मी मुख्यमंत्री म्हणून पूर्वी काम केले आहे. आता तो काळ राहिलेला नाही.
माझ्या भाषणाचा काहींनी चुकीचा अर्थ लावला
कामत म्हणाले की, मला आणखी कोणतेच नवे विधान करुन नवा वाद सुरु करायचा नाही. तुम्ही प्रतिक्रीया मला विचारली म्हणून सांगतो, मी गोव्यातील किंवा सासष्टीतील कोणत्या आमदारांविषयी काहीच बोललो नव्हतो. माझे भाषण जर नीट ऐकले तर प्रसार माध्यमांना वस्तुस्थिती कळून येईल. मी भाषण करताना माझ्या नजरेसमोर लोकसभा निवडणुकीचा निकाल होता. अलिकडेच काँग्रेसला केवळ ९९ जागा मिळाल्याने राहून गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, हा माझा मुळ मुद्दा होता. मात्र काही जणांनी चुकीचा समज पसरवला. आता प्रमोद सांवत हे आमचे नेते असून मी त्यांच्या नेतृत्वाशी सहमत आहे.