पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना त्यांच्या आल्तिनो-पणजी येथील सरकारी बंगल्यात, तसेच मडगावातील खासगी बंगल्यात लाच दिली. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना आल्तिनो येथील सरकारी बंगल्यात तसेच वार्का येथील खासगी बंगल्यात लाच देण्यात आली. पंचनामा केला असता एका खासगी साक्षीदाराकडून बंगले आणि पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्या लोकांची ओळख पटविली आहे. क्राईम ब्रँचने चर्चिलच्या जामिनाला हरकत घेताना सोमवारी न्यायालयात हे म्हणणे मांडले. कोणत्या मंत्र्याला कोणी आणि कोठे लाच दिली हे उघड झाले आहे. कामत यांना त्यांच्या अल्तिनो-पणजी येथील तत्कालीन मुख्यमंत्री निवासात लुईस बर्जरच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी लाचेचा एक हप्ता दिला. दुसरा हप्ता हा त्यांच्या मडगाव येथील खासगी बंगल्यात देण्यात आला. चर्चिलनाही एक हप्ता मंत्रिपदाच्या काळात त्यांचा ताबा असलेल्या अल्तिनो येथील सरकारी बंगल्यात तर आणखी एक हप्ता वार्का येथील त्यांच्या खासगी बंगल्यात देण्यात आला. चारही घटनांत पैसे देणारे आणि पैसे घेणारेही पंचनाम्याच्या दरम्यान साक्षीदाराने ओळखल्याचे क्राईम ब्रँचने न्यायालयात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री निवासात दिगंबरना लाच!
By admin | Published: August 11, 2015 1:35 AM