तेव्हा राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र देण्यास दिग्विजय सिंहांनीच केला अटकाव - लुईजिन फालेरो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:59 PM2019-02-19T16:59:20+5:302019-02-19T16:59:55+5:30
गोव्यात काँग्रेस सत्तेपासून दूर रहाण्यासाठी काँग्रेसचेच नेते कारणीभूत होते हे माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईजिन फालेरो यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मडगाव - जनाधार नसतानाही भाजपने गोव्यात मागच्या दाराने सत्ता स्थापन केली असा आरोप आतार्पयत काँग्रेस पक्ष करत आला होता. मात्र गोव्यात काँग्रेस सत्तेपासून दूर रहाण्यासाठी काँग्रेसचेच नेते कारणीभूत होते हे माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईजिन फालेरो यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेस नेते दिग्वीजय सिंग यांच्यामुळेच काँग्रेस गोव्यात सत्ता स्थापन करु शकली नाही, असा आरोप त्यांनी केला.
सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यावेळचे गोव्याचे काँग्रेस प्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेचे पत्र देण्यास अडविल्यामुळेच गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करु शकले नाही असा गौप्यस्फोट आतार्पयत या विषयावर वक्तव्य न केलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष लुईजिन फालेरो यांनी मंगळवारी केला.
Goa Congress MLA, Luizinho Faleiro: After the last assembly elections Digvijay Singh didn't allow me to hand over the letter to the Governor for formation of govt. As a protest I resigned from Pradesh Congress Committee & have refused to take position of the leader of opposition. pic.twitter.com/rLGDjpVclH
— ANI (@ANI) February 19, 2019
2017 ची निवडणूक गोव्यात काँग्रेसने लुईजिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. या निवडणुकीत काँग्रेसला 17 तर भाजपाला 13 जागा प्राप्त झाल्या होत्या. एकूण 40 मतदारसंघाच्या गोवा विधानसभेत काँग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी आणखी चार आमदारांची गरज होती. त्यावेळी निवडून आलेले तीन अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे ठरविले होते. पण 21 आमदारांची संख्या हाती असतानाही काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने अल्पमतात असलेल्या भाजपाने नंतर मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन केले होते.
दक्षिण गोव्यातून लुईजीन फालेरो लोकसभेची निवडणूक लढविणार अशाप्रकारच्या बातम्या येत आहेत. या पाश्र्र्वभूमीवर बोलताना फालेरो यांनी वरील गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, त्यावेळीच मी या घटनेचा निषेध म्हणून प्रदेश समितीचा व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. एवढेच नव्हे तर विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून मला इतरांपेक्षा जास्त मते पडूनही मी हे पद घेण्यास नकार दिला होता व विरोधी पक्ष नेते पदही नाकारले होते. फालेरो म्हणाले, त्यावेळी मी नावेली मतदारसंघावरच जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले होते. आजही माङो मत तेच आहे.
सरकार स्थापन करण्यापासून अडविले गेल्यामुळे त्यावेळी फालेरो दुखावले होते. तो कडवटपणा अजुनही दूर झालेला नाही असे फालेरो यांच्या मंगळवारच्या वक्तव्यावरुन दिसून आले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी 24 तासात सरकार स्थापन करण्याचे आश्र्वासन दिले होते. मात्र या आश्र्वासनाला 24 महिने उलटून गेले तरीही पूर्ण झालेले नाही. असे जरी असले तरी अजुनही मी संयम बाळगून आहे. कधीतरी काँग्रेस सरकार करेलच याची मला खात्री आहे असे खोचकपणो ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नाही हे स्पष्ट करताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या प्रथेप्रमाणो इच्छुक उमेदवार सुरुवातीला प्रदेश समितीकडे आपला अर्ज देतो त्यानंतर हा अर्ज छाननी समितीकडे जातो व छाननी समितीमार्फत तो केंद्रीय समितीकडे पाठविला जातो. मी अजुनर्पयत असा कोणताही अर्ज केलेला नाही त्यामुळे या बातम्या नेमक्या कुठून येतात हेच मला समजेनासे झाले आहे.