पणजी : पीएमसी बँकेचे संचालक विदेशात पळून जाण्याआधी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अर्थतज्ज्ञ प्रा. गौरव वल्लभ यांनी केली आहे. खातेधारकांना बँकेतील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने त्वरित उठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. गोव्यातील म्हापसा अर्बन बँकेचे पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेत (पीएमसी) विलीनीकरणाचा प्रस्ताव होता.
पत्रकार परिषदेत वल्लभ म्हणाले की, ‘बँकेतून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध त्वरित उठविले जावेत. रिझर्व्ह बँकेने संचालकांना बोलावून त्यांची चौकशी करावी तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावेत. नपेक्षा संचालक विदेशात पळून जातील.’ ते म्हणाले की,‘बँक एका रात्रीत डबघाईला आलेली नाही. बँक बुडत असल्याचे किंवा बँकेतील गैरव्यवहारांचे संकेत आधीच रिझर्व्ह बँकेला मिळाले असतील. तसे असले तर मग रिझर्व्ह बँंकेने त्याकडे दुर्लक्ष का केले? कोण याला जबाबदार आहे याचीही चौकशी व्हायला हवी. संचालक मंडळाने खरी माहिती का लपविली?’
भाजपाचेच नेते किरीट सोमय्या यांनी या बँकेत तब्बल ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. पीएमसी बँकेने कर्ज थकलेल्या एका कंपनीला मोठे कर्ज दिलेले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वल्लभ म्हणाले की, ‘सत्ताधारी भाजपशी या बँकेच्या संचालकांचे हितसंबध आहेत म्हणूनच कारवाईबाबत टाळाटाळ केली जात आहे. मुलुंडमध्ये ४ वेळा आमदार बनलेल्या राजकीय नेत्याचा पुत्र या बँकेवर संचालक आहे.
वल्लभ म्हणाले की, बँकेतील प्रत्येक खातेधारकाला त्याचे पैसे काढायला मुभा मिळाली पाहजे. लोकांनी बचत करुन पैसे बँकेत ठेवलेले असतात. बँक व्यवस्थापनाच्या चुकीमुळे किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे खातेधारकांना वेठीस धरले जाऊ नये. पीएमसी बँकेमध्ये महाराष्ट्रातील इतर सहकारी बँकांच्याही मोठ्या रकमेच्या कायम ठेवी आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांच्या ठेवी आहेत त्यांना हे पैसे काढायला मिळायला हवेत. वल्लभ म्हणाले की, ‘ बँकांमधील घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका आकडेवारीचा हवाला देऊन त्यांनी असा दावा केला की, २0१८ मध्ये तब्बल ४१,१६७ कोटींचा बँक घोटाळा झाला. २0१९ मध्ये हा आकडा आतापर्यंत ७१,५४३ कोटींवर पोहोचला आहे. बिगर उत्पादक मालमत्तेचे प्रमाण सहापटींनी वाढले आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस प्रदीप नाईक, प्रदेश काँग्रेसच्या मिडिया कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.