पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यावर काँग्रेस हाय कमानने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत, त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीच्या (CWC) कायम स्वरूपी निमंत्रित सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. खरे तर, दिगंबर कामत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ते काँग्रेसचा राजीनामा देऊ शकतात, असे वृत्त आहे. तत्पूर्वी, कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापतींकडे केली आहे.
यातच, 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने गोव्याच्या आपल्या 11 पैकी पाच आमदारांना चेन्नईला पाठवले आहे. एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळीच विधानसभेची कार्यवाही संपताच समाप्त पाच आमदारांना चेन्नईला पाठवण्यात आले आहे. यात एल्टम डिकोस्टा, रूदर्फ फर्नांडिस, युरि आलेमाव, संकल्प आमोणकर आणि कार्लोस अल्वारेस फरेरा यांचा समावेश आहे. हे आमदार थेट राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यासाठी सोमवारी गोव्यात येतील.
तसेच, काँग्रेसचे दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायल लोबो, राजेश फळदेसाई, अॅलेक्स सिक्वेरा आणि केदार नाईक हे सहा आमदार गोव्यातच आहेत. हे सहाही आमदार भाजपमध्ये जाण्यास तयार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत आमदार मायकल लोबो यांचीही गेल्या रविवारी विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी केली होती.