पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीविषयी भाजपचे आज गुरुवारी विचारमंथन होणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून भाजपची दिवसभराची राज्य कार्यकारिणी बैठक पणजीत होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय संयुक्त सचिव बी. एल. संतोष, केंद्रीय प्रमुख अविनाश खन्ना आणि राज्य संघटक विनय पुराणिक यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार या बैठकीला उपस्थित असतील.
मुख्यमंत्री पर्रिकर हे उपचारांनिमित्ताने अमेरिकेला असल्याने आजच्या बैठकीवेळी बी. एल. संतोष हे प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील. राज्यात सध्या जी राजकीय स्थिती आहे, त्याबाबत भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार बोलतील, असे सुत्रंनी सांगितले. काँग्रेस पक्षाने राज्यात सरकारच अस्तित्वात नाही अशी टीका करून सोमवारीच राज्यपालांकडे धाव घेतली. यापुढे लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यावेळी भाजपला किती अनुकूल किंवा प्रतिकुल स्थिती असेल याबाबतही काहीजण भाष्य करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर हेही बैठकीत भाग घेतील. या शिवाय विद्यमान मंत्री पांडुरंग मडकईकर, विश्वजित राणो, माविन गुदिन्हो यांनाही खास निमंत्रित म्हणून कार्यकारिणीवर स्थान असल्याने तेही बैठकीस उपस्थित असतील.
भाजपची कोअर टीम अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आली. शहा यांनी राज्य कार्यकारिणी बैठक घेण्याची सूचना प्रदेश भाजपला केली होती. त्यानुसार पणजीतील एका प्रमुख हॉटेलमध्ये दिवसभर ही बैठक होईल. नोकरभरती जवळजवळ बंद असल्यानेही भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व काही आमदारही नाराज आहेत. राज्यात पीडीएविरोधी व प्रादेशिक आराखडाविरोधी वाद सुरू आहे. त्याचेही प्रतिबिंब आजच्या बैठकीत पहायला मिळेल. अमित शहा हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे येत्या महिन्याच्या दुस:या पंधरवडय़ात गोवा भेटीवर येणार आहेत. दहा हजार बुथस्तरीय कार्यकत्र्याचा मेळावा त्यावेळी भाजपकडून आयोजित केला जाईल. आजच्या बैठकीत त्या मेळाव्याच्या तयारीबाबतही प्रमुख चर्चा होईल, असे भाजपच्या एका पदाधिका:याने सांगितले.