विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : 'गोवा हे देशातील आदर्श व विकासात्मक राज्य म्हणून नावारुपास आले आहे. तरीही आणखी चांगले प्रकल्प साकारण्यासाठी एकात्मिक विकास प्रकल्प आराखडा महिनाभरात तयार केला जाईल. यातून देशात गोवा रोल मॉडेल ठरेल असा विकास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आहे. त्यासाठी विशेष योजना करून विशेष कृतियोजना आखण्यात येईल' असे माजी केंद्रीय अर्थमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. प्रभू यांनी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
प्रभु म्हणाले की, गोव्याला प्रगतीपथावर नेताना हरित क्रांतीसह कुक्कुट पालन, शेती, प्रक्रिया उद्योग व इतर बाबतीत व्यक्तीचा व कुटूंब प्रत्येक घटकाचा विकास व्हावा ही मुख्यमंत्री सावंत यांची धारणा आहे. त्यासाठी नव्या योजना आखण्याबाबत आमची सविस्तर चर्चा झाली. शेतमालाला चांगला दर मिळावा, सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेताना प्रत्येकाला काम मिळावे आणि राज्याची झपाट्याने प्रगती व्हावी असा हेतू आहे. त्यासाठीची कृती योजना आम्ही तयार करणार आहोत. महिनाभरात हा आरखडा तयार करू' असे प्रभू यांनी सांगितले.
दरम्यान, प्रभू यांनी गोमांचल डेअरी फार्मला भेट देऊन पाहणी केली. सुभाष मळीक, वल्लभ साळकर, शिवानंद बाक्रे, सचिन साळकर आदी उपस्थित होते. डेअरी फार्ममध्ये जोड उद्योग सुरू करण्याबाबत त्यांनी सदस्यांशी चर्चा केली.
विविध पर्यायांवर भर
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, आम्ही राज्याला आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास घेत प्रक्रिया सुरू केलेली आहे. युवा शक्तीला विविध पर्याय देताना उद्योग, व्यवसायांबरोबरच जोड उद्योग कसे येतील याचा विचार करीत आहोत. कमी मनुष्यबळातही जादा उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत आम्ही आराखडा तयार करण्याचा संकल्प केला आहे. सुरेश प्रभू यांच्या बुद्धिमत्तेचा गोव्याला निश्चित फायदा होईल. पडीक शेती लागवडीखाली यावी, हरित व धवल क्रांती व्हावी यासाठीच्या प्रकल्पांबरोबरच नवनवीन कौशल्य विकसित करण्यावर आमचा विशेष भर आहे. त्यादृष्टीने आम्ही अनेक पर्याय निवडून आराखडा तयार करीत आहोत' असे मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर सांगितले.