पणजी : काँग्रेसने नेमलेली प्रदेश निवडणूक समिती अगोदर बरखास्तच करा, अशी जोरदार मागणी काँग्रेसमधील युवा वर्गाने चालविली आहे. काँग्रेसचे सचिव दुर्गादास कामत तसेच तन्वीर खतिब, फिरोज खान, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस ऐश्वर्या साळगावकर आदींनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली व निवडणूक समिती बरखास्त करा व पक्षाची समन्वय समितीही बदला, अशी मागणी केली. कामत म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. मात्र, जुन्या आणि पराभूत तसेच विविध घोटाळ्यांचे आरोप असलेल्या नेत्यांना प्रदेश निवडणूक समितीवर स्थान देऊ नका. तसेच अशा नेत्यांना निवडणुकीवेळी उमेदवारी देऊ नका, त्याऐवजी युवकांना पुढे आणा, अशी आमची मागणी आहे. कामत म्हणाले की, लुईझिन फालेरो यांनी आपण जुन्या नेत्यांचा मेंटर नव्हे, असे विधान केले आहे. आम्ही त्या विधानाचे स्वागत करतो. आता फालेरो यांनीच निवडणूक समिती बरखास्त व्हावी म्हणून पुढाकार घ्यावा. आमच्या भूमिकेशी ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही सहमती दाखवली आहे. काँग्रेसमध्ये युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांना पुढे आणावे या आमच्या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे. काँग्रेसमध्ये महिलांनाही वाव द्या, महिलांनाही निवडणुकीवेळी अधिकाधिक उमेदवारी दिली जावी, अशी मागणी ऐश्वर्या साळगावकर यांनी केली. आपण अल्पसंख्याक विभागाचे व म्हापसा गटाचे पदाधिकारी असताना उरफान मुल्ला हे आपण कुणीच नव्हे, असे म्हणत आहेत. मुल्ला यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवीन, असा इशारा फिरोज खान यांनी दिला. तन्वीर खतिब यांनी या वेळी सांगितले की, आपली काँग्रेसमधून यापूर्वी कधीच कुणी हकालपट्टी केली नव्हती. काणकोणमध्ये काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी जो मदत निधी जमविण्यात आला होता, त्यात युवक काँग्रेसच्या त्या वेळच्या काही नेत्यांनी घोटाळा केला होता. गरीब पूरग्रस्तांसाठी असलेले पैसे लाटले होते आणि आपण तो घोटाळा उघड केला होता म्हणून आपले पद काढून घेण्यात आले होते. (खास प्रतिनिधी)
निवडणूक समिती बरखास्त करा
By admin | Published: April 27, 2016 2:00 AM