लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शिवसेनेचे (उबाठा) दक्षिण जिल्हाप्रमुख आलेक्सी फर्नांडिस यांची शिस्तभंगाचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी केली आहे.
शिवसेना (उबाठा) गोव्यात इंडिया आघाडीत घटक असताना व काँग्रेसने आघाडीसाठी उमेदवार दिल्याने त्यांच्यासाठी काम करायचे सोडून आलेक्सी यांनी स्वतः दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे.
आलेक्सी यांच्याशी संपर्क साधून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे पक्षाचे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी म्हटले आहे.
पक्षाचे गोवा प्रभारी संजय राऊत यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी केली आहे, असे कामत यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण गोवा जिल्ह्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि शाखा विस्तार समितीचे प्रमुख राजू विर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.