लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे काल दोनापावल येथील जेटीजवळ स्थानिक विक्रेत्यांच्या विषयावरून आमनेसामने आले. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा व प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या उपस्थितीत बाबूशने युरी यांच्या मागणीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला तर युरीने तुम्ही स्थानिक विक्रेत्यांचे संरक्षण करा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी बाबूशही भडकले व आपण देखील गोंयकारच आहे व आपण कुणाला त्रास केला नाही, असे सांगत आपला आवाज वाढवला.
जेटीकडील गेट काढली जावी, प्रवेश शुल्क नको आदी मागण्या युरी व पाटकर यांनी केल्या. मोन्सेरात यांनी हा माझा मतदारसंघ आहे, तुम्ही ढवळाढवळ करू नका असा सल्ला त्यांना दिला. आपण आपल्या मतदारसंघातील लोकांच्या हिताचे रक्षण करतो. आपण दोनापावलच्या गोंयकार विक्रेत्यांना त्रास दिलेला नाही. आपणही गोंयकार, मी मेलेलो नाही, मी विक्रेत्यांचे रक्षण करीन असे बाबूश म्हणाले. यावेळी वातावरण तंग बनले. जेटीकडील स्टॉल्स लवकर तयार व्हायला हवे, आपण पर्यटन मंत्र्याशी बोलेन असे मोन्सेरात म्हणाले.
दोनापावला जेटीवरील विक्रेत्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लस फेरेरा यांना मोन्सेरात यांनी विक्रेत्यांच्या प्रश्नावर राजकारण करु नका. माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे सुनावले आहे.
'माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका'
विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. विरोधक हे केवळ राजकीय स्वार्थासाठी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. या ठिकाणी एकाही परप्रांतीयास व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. जेटीवरून विरोधकांनी राजकारण केले तर विक्रेत्यांचा प्रश्न सुटणार नाही. आम्ही या स्थानिक विक्रेत्यांसोबत आहोत. तसेच येथील प्रवेशद्वार हे पर्यटन खात्याने उभारले आहे. महसूल मिळत असल्याने ते हटवणे शक्य नसल्याचेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.
सरकारने विक्रेत्यांना न्याय द्यावा : फेरेरा
गेल्या अनेक वर्षांपासून जेटी परिसरात स्थानिक लोक व्यवसाय करत आहेत. आज पर्यटक येतात म्हणून त्यांचा व्यवसाय चालत आहे. मात्र, या ठिकाणी अवाजवी शुल्क लावून प्रवेश दिला जात असल्याने पर्यटक जेटीकडे येण्यास टाळाटाळ करत आहेत. याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होत असल्याचे आमदार कार्ल्स फेरेरा यांनी सांगितले.
प्रवेशद्वार हटवा
दोनापावला येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारामुळे स्थानिक विक्रेत्यांना फटका बसत आहे. तसेच जेटी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रति व्यक्ती ५० रुपये आकारले जात असल्याने पर्यटकांनी जेटीकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक बसेस आत सोडले जात नसल्याने पर्यटक पायी जाणे टाळत आहेत. मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांनी याची दखल घेऊन येथील प्रवेशद्वार हटवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
सोमवारपर्यंत प्रश्न मार्गी लावा : काँग्रेस
काल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लस फेरेरा यांनी कार्यकर्त्यांसह जेटीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कोट्यवधी खचून दोनापावला जेटीचे काम केले जात आहे. मात्र, सरकारला येथील स्थानिक विक्रेत्यांचे काहीच पडलेले नाही. या विक्रेत्यांचे योग्य पुनर्वसन केलेले नाही. सोमवारपर्यंत विक्रेत्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जेटीवर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. भाजप सरकार स्थानिकांचा व्यावसाय नष्ट करू पाहत आहे. दोनापावला जेटीसाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या ठिकाणाचे महत्त्व विशद करणारे दोना आणि पावला यांचे पुतळेही उभारण्यात आलेले नाहीत. येथील स्थानिक विक्रेत्यांकडेही दुर्लक्ष केले आहे. सरकारने याकडे गांभीयनि पाहावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.