लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात राज्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी करणारा खासगी ठराव फेटाळण्यात आल्याच्या विषयावरुन शुक्रवारी केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा व विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यात वाद निर्माण झाला. हा ठराव सरकारने मुद्दाम फेटाळल्याचा आरोप एल्टन यांनी केला असून त्याला आमदारांचे अपरिपक्वता दर्शवणारे विधान असल्याचे प्रत्युत्तर सभापतींनी दिले आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच राजकीय संघर्षांची झलक दिसू लागली आहे.
आमदार एल्टन डिकोस्टा यांनी राज्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी करणारा खासगी ठराव अधिवेशनासाठी दाखल केला होता. हा ठराव सरकारने फेटाळल्याने संतप्त झालेल्या एल्टन यांनी, 'भाजप सरकार आणि सभापतींनी मुद्दाम हा ठराव फेटाळला. सभापती व सरकार हे एसटी समाजाविरोधात आहेत' अशी टीका केली.
सभापती तवडकर यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आमदार डिकॉस्टा यांचे आरोप फेटाळले 'आमदारांचे हे विधान अपरिपक्वता दर्शवणारे आहे. त्यांनी सरकार व आपल्यावर बिनबुडाचे आरोप थांबवावे' असे ते म्हणाले. सभापती म्हणाले की, 'आगामी विधानसभा अधिवेशननात राज्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी करणारा खासगी ठराव केपेचे आमदार डिकॉस्टा यांनी सादर केला होता. मात्र हा ठराव फेटाळला आहे. त्यानंतर आमदारांनी गोवा सरकार व सभापती हे एसटी समाजाविरोधात असल्याचे भासवत आरोप केले आहेत. खरेतर आल्टन यांच्याविषयी काय बोलावे हेच मला समजत नाही.
तवडकर म्हणाले की, यापूर्वीच्या अधिवेशन सत्रात सांगेचे आमदार गणेश गावकर यांनी सादर केलेल्या, राज्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्याच्या ठरावावर विधानसभेच्या ठरावावर चर्चा झाली आहे. एसटींना राजकीय आरक्षण मिळावे असा ठरावही झाला. त्यावेळी विरोधी पक्षनेता तसेच अन्य विरोधी आमदारांनी या विषयावर मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत एक तासाहून अधिक चर्चाही झाली होती. राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. मग आमदार का आरोप करीत आहेत?
मी परिपक्वता दाखवलीय: एल्टन
दरम्यान, एसटी राजकीय आरक्षणाचा ठराव नाकारल्याची माहिती देताना तवडकर यांनी जी टीका केली त्यावर आमदार एल्टन यांनी उत्तर दिले आहे. एल्टन म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात प्रचार करुन उमेदवार निवडून आणून मी माझी परिपक्चता दाखवली, सभापतींकडून मला परिपक्वतेच्या प्रमाणपत्राची गरज नाही.'
आरोप अपरिपक्वता दाखवतात : सभापती
सभापती तवडकर म्हणाले की, 'एल्टन हे सरकार व आमच्यावर करीत असलेले आरोप अपरिपक्चता दर्शवणारे आहेत. एल्टन हे नवीन आमदार नाहीत. त्यांना अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. विधानसभेचे कामकाज त्यांना माहीत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना काय बोलावे हे समजवण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी अशी विधाने करू नयेत.