पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकमधील भाजपाची राजकीय लॉबी यांच्या दबावाला बळी पडून गोव्याच्या हिताचा गोवा सरकार बळी द्यायला निघाले आहे. अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरून अनेक तरूण करू लागले आहेत. शिवाय गोव्यातील पाणी प्रश्नाचे अभ्यासक तथा गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनीही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तातडीने पत्र लिहून पर्रीकर सरकार उचलत असलेल्या पावलांना आक्षेप घेतला आहे. त्यांनी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कर्नाटकचा यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास कर्नाटकवर आमचा विश्वास नाही, असे पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. पिण्याचे पाणी कुणालाही देण्यास आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही पण कर्नाटकवर सरकारने विश्वास ठेवू नये, असे मंत्री सरदेसाई यांनी म्हटले आहे. पिण्याचे पाणी दिल्यानंतर जर त्यापुढेही अन्य कोणत्या कारणास्तव गोवा सरकारने कर्नाटकला म्हादई नदीतील पाणी दिले तर मग आमच्या पक्षाचे मंत्री जलसंसाधन हे खाते स्वत:कडे ठेवणार नाहीत, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे. सरदेसाई यांनी पिण्याचे पाणी कर्नाटकला देण्यास थेट विरोध मात्र केलेला नाही.
डॉ. नंदकुमार कामत यांनी पर्रीकर यांना पूर्णपणं सावध करणारे पत्र लिहिले आहे. गोवा म्हादई बचाव अभियानानेही पर्रीकर यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. म्हादई नदीमध्ये अगोदरच पाण्याचा तुटवडा आहे. गोव्यातील भावी पिढीला पाण्याची समस्या ख-या अर्थाने भेडसावेल, असे डॉ. कामत यांनी नमूद करून तुम्ही कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याविषयी चर्चा करण्याचे पत्र देऊ नका, अशी मागणी कामत यांनी र्पीकर सरकारकडे केली आहे. मात्र मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोवा मंत्रिमंडळाला, गोव्यातील विधानसभेला आणि विरोधी पक्षांनाही काहीच कल्पना न देता कर्नाटकचे नेते येडीयुरप्पा यांना पत्र देऊनही टाकले.
पत्र दिल्यानंतर मग ते पत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले आहे. एक-दोन मंत्री वगळता पर्रीकर सरकारमधील अनेक मंत्री आणि भाजपचे बहुतेक आमदार यांना सरकारच्या या भूमिकेमुळे धक्का बसला आहे. मात्र भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानेच कर्नाटकला पिण्याचे पाणी गोव्याकडून दिले जावे अशी भूमिका घेतलेली असल्याने व कर्नाटकमध्ये भाजपला याचा फायदा होणार असल्याने गोव्यातील भाजपचे आमदार आणि काही मंत्री सध्या शांत राहिले आहेत. ते मूका मार सहन करत असल्याची प्रतिक्रिया गोव्याच्या सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.
कर्नाटकवर विश्वास ठेवू नका, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कर्नाटक म्हादईप्रश्नी डाव खेळू शकते असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे पिण्यासाठीदेखील म्हादई नदीतील पाणी गोव्याने कर्नाटकला देणो कधीच मान्य केले नव्हते. ते काम आता पर्रीकर करू लागल्याने सर्वानाच धक्का बसल्यासारखी स्थिती आहे.