पणजी : कॅसिनो व्यवसाय राज्यातील गोमंतकीय कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करत आहे. तशा प्रकारच्या तक्रारी ब-याच वाढल्यानंतर व कॅसिनोंचे दुष्परिणाम सर्वत्रच अनुभवास आल्यानंतर राज्यातील महिला संघटनांनी येत्या 18 रोजी गोवा क्रांती दिनी आझाद मैदानाकडे जमून कॅसिनोंचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. आम, औरत, आदमी अगेन्स्ट गॅमबलिंग या संघटनेच्या निमंत्रक सॅबिना मार्टीन्स यांनी अन्य काही महिला कार्यकत्र्यासोबत शनिवारी येथे पत्रकार परिषद घेतली.गोवा मुक्तीच्या चळवळीला 18 जूनपासून धार चढली होती. त्याच दिवशी आम्ही अझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाकडे जमू व कॅसिनोंचा निषेध करू. गोव्यात ग्राहकांसाठी मुली सहज उपलब्ध आहेत अशा प्रकारची जाहिरातही एका संकेतस्थळावरून केली जात असल्याचे माटीन्स यांनी सांगून याविषयी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. निषेध कार्यक्रम सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होईल. आम्हाला कॅसिनोंच्या दुष्परिणामांपासून गोव्याला मुक्त करायचे आहे. पणजीतील कॅसिनो हे मोपा किंवा अन्य ग्रामीण भागांमध्ये गेले तर, ग्रामीण भागातील गरीब लोक उद्ध्वस्त होतील. तेथील युवा पिढी व्यसनी होईल.पणजीतील अनेक मोठ्या व्यवसायिकांची पोरे कॅसिनो खेळून कजर्बाजारी झाली असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले. लोकलज्जेस्तव अशा पोरांचे वडिल बँकांची कज्रे भरतात. पणजीतील एका महिलेच्या पतीने कॅसिनोपोटी फ्लॅटदेखील गहाण ठेवला व ती महिला पूर्ण अडचणीत आली. आम्हा महिला संघटनांकडे तक्रारी येत आहेत. कॅसिनो व्यवसायिक अनेक राजकारण्यांना नियमितपणो पैसे पुरवित आहेत. त्यांनी गोव्यात अनेक मोठमोठय़ा जमिनी खरेदी केल्या आहेत.पणजीतील अनेक हॉटेलांच्या खोल्या कॅसिनो व्यवसायिक आरक्षित करतात. तिथे वेश्या व्यवसायही चालतो असे मार्टीन्स यांनी सांगितले. कॅसिनो व्यवसाय हा पर्यटन उद्योगाचा भाग आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटल्याचा आम्ही निषेध करतो. कॅसिनोंना प्रोत्साहन देऊ नये, प्रोत्साहन देण्यासाठी कॅसिनो म्हणजे राष्ट्रवाद नव्हे. प्रत्येक जुगार हा राष्ट्रीयत्वाच्या विरोधात आहे, असे मार्टीन्स म्हणाल्या. यावेळी आफ्रू शेख, रशिता पिळर्णकर,सौ. रशिता आदी उपस्थित होत्या. आवडा व्हीएगस यांच्याही संस्थेचा आम्हाला पाठींबा आहे, असे मार्टीन्स म्हणाल्या.
कॅसिनोंमुळे गोमंतकीय कुटुंबे उद्ध्वस्त, 18 रोजी महिलांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:45 PM