मडगाव : भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी प्रथम आमदारकीचा राजीनामा देऊन, भाजप सरकारला आम्ही पाठिंबा देणार असे स्पष्ट सांगून निवडणूक लढवावी, असा ठराव शनिवारी मडगावच्या लोहिया मैदानावर आयोजित प्रोटेस्ट रॅलीत मंजूर करण्यात आला. मतदारांच्या जनादेशाचा अनादर करणाऱ्या उमेदवारांना कधीही मत दिले जाणार नाही. जनादेश मिळून सर्वाधिक जागा प्राप्त करणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणाऱ्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांना केंद्र सरकारने बडतर्फ करावे, असा ठरावही या सभेत घेण्यात आला.उद्योजक दत्ता नायक यांनी या वेळी मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर कडाडून टीका केली. सरदेसाई यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्याला क्षमा नाही. लोकांना जास्त दिवस आठवण राहात नाही, असा काहींचा भ्रम असतो. मात्र, सरदेसाई यांनी जे कृत्य केले ते आम्ही मनात ठेवू आणि पुढच्या निवडणुकीत त्यांना त्यांचे स्थान दाखवून देऊ, असे ते म्हणाले. पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तर भाजपला पाठिंबा देऊ, असे आश्वासन दिल्याचे सरदेसाई सांगतात, मग फातोर्डावासीय तसेच गोंयकारांना निवडणुकीवेळी जे आश्वासन दिले ते कसे मोडले, असा सवालही त्यांनी केला.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप म्हणाले, सर्वांत जास्त जागा मिळविणारा पक्ष म्हणून भाजपला अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास राष्ट्रपतींनी निमंत्रित केले होते. मात्र, बहुमत नसल्याने वाजपेयी यांनी राजीनामा दिला होता. देवेगौडा व नंतर इंद्रकुमार गुजराल यांनीही हीच रित अवलंबविली होती, याची आठवण खलप यांनी करून दिली. जर भाजपला या गोष्टींची चाड असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. मतदारांना काय तो निर्णय घेऊ द्या, असे ते म्हणाले. भाजप नको म्हणून लोकांनी काँग्रेसला सर्वाधिक जास्त जागा मिळवून दिल्या. भाजपविरोधात जनतेने हा कौल दिला होता. भाजपला जनाधर मिळाला नसतानाही या पक्षाने सत्ता काबीज केली, ती कशा पध्दतीने केली हे सर्वांना माहीत आहे. केंद्राचा पैसा, गृह खाते तसेच राज्यपालांना हाताशी धरून भाजपने सत्ता मिळविली. माझ्याविरुध्द या सरकारने पोलीस तक्रारही केली आहे. मात्र, मी घाबरणार नाही, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. डॉ. फ्रान्सिस कुलासो यांनीही सरदेसाई यांच्यावर टीका केली.पत्रकार राजन नारायण, स्वाती केरकर, अविनाश भोसले, तियात्रिस्त फ्रान्सिस द तुये व डेनिस फर्नांडिस यांचीही या वेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)
सरदेसार्इंकडून जनादेशाचा अनादर
By admin | Published: March 19, 2017 2:05 AM