पणजी : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा एकदा प्लास्टिक वापर बंदीच्या घोषणोचा उच्चार केला. सरकारच्या हस्तकला विकास महामंडळाने कापडी बॅगांचे वाटप बुधवारपासून सुरू केले. यापुढे बाजारपेठांमध्ये किमान दराने ह्या कापडी पिशव्या वितरित केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.पणजीत मुख्यमंत्र्यांच्या सहभागाने भाजपाने पदयात्रा काढली. आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, अन्य सर्व नगरसेवक व भाजपाचे पणजीतील प्रमुख कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी पदयात्रेचे उद्घाटन केले. स्वच्छता, अहिंसा, सत्य या गांधींच्या गुणांचा आम्ही प्रसार करायला हवा. पर्यावरण सांभाळण्यासाठी सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्ण थांबवायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पहिल्या टप्प्यात कुणाला दंड ठोठावणार नाही. प्रथम फक्त जागृतीवर भर दिला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बाजारपेठांमध्येही पूर्णपणे टाळायला हवा. त्यासाठी कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सरकारच्या महामंडळाने सुरू केला आहे. बुधवारी काही पिशव्या जुनेगोवे येथे झालेल्या गांधी जयंतीच्या सोहळ्यावेळी वितरीत केल्या गेल्या. यापुढे पालिकांनी बाजारपेठांमध्ये किमान दराने ह्या पिशव्या लोकांना द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.महापौरही भाजपातपणजीतील भाजप कार्यालयाकडून सुरू झालेली पदयात्र पणजी शहरात फिरून मग आझाद मैदानावर विसर्जित झाली. मुख्यमंत्र्यांनीच यात्रेचा समारोप केला. अनेक विद्यार्थी व शिक्षक पदयात्रेत सहभागी झाले. त्याशिवाय ब्रह्मकुमारी व अन्य संस्थांनीही भाग घेतला. या सर्वाचे आपण आभार मानतो. गांधी जयंतीचा कार्यक्रम केवळ एकच दिवस आयोजित करून आम्ही थांबणार नाही. वर्षभर सरकार विविध कार्यक्रम आयोजित करील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महापौर मडकईकर, माजी महापौर विठ्ठल चोपडेकर वगैरे सगळे प्रथमच भाजपच्या उपक्रमात अधिकृतरीत्या सहभागी झाले. एकंदरीत त्यांचा भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश झाल्यासारखे झाले. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी मात्र पदयात्रेत भाग घेतला नाही.
कापडी पिशव्यांचे वाटप सुरू, प्लास्टिक वापर बंदीविषयी मुख्यमंत्री ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:38 AM