पणजी: राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी लॅपटॉपसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीले आहे. आम्ही कौशल्य वाढवण्याबरोबरच अपस्किलिंग आणि री-स्किलिंग उपक्रमांना प्राधान्य देतो. राज्यातील शाळांमध्ये देखील डिजिटल शिक्षण योग्य प्रकारे मिळावे यासाठी सक्षम शिक्षक उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्याने अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनुसूचित जाती (एससी) समुदायातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटपाचे कार्यक्रम नुकताच गोवा मनोरंजन संस्थेच्या मॅकनिझ पॅलेस येथे घडवून आणला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. तर त्यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे, लेखा खात्याचे संचालक दिलीप हुमरसकर, समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालिका यशस्विनी बी., इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वळवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करण्यासाठी लॅपटॉप देऊन त्यांना पाठिंबा देत असतो. राज्यात उच्चस्तरीय शैक्षणिक संस्था आहेत. शिवाय, परदेशी शिक्षणात प्रवेश सुलभ करण्यासाठी, आम्ही मनोहर योजना अंतर्गत आर्थिक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी वार्षिक ३५ लाखांपर्यंतच्या तरतुदी आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
लॅपटॉप ही काळाची गरज बनली आहे. विकसित भारत विकसित गोवाच्या धोरणाला चालना देत आम्ही लॅपटॉपचे वितरण विद्यार्थ्यांना करत आहोत. लॅपटॉप प्रदान करून, आम्ही डिजिटल अंतर भरून काढतो आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी होण्यास देखील मदत करतो. एसटी आणि एससी विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी समान संधी उपलब्ध करून देणे हे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्याच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
एसटी आणि एससी समुदायातील प्रत्येक तालुक्यातील १० गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात आले. हे लॅपटॉप दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.