पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उत्तर जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी आर. मेनका तर दक्षिण जिल्हाधिकारीपदी अजित रॉय हे काम पाहतील.आयएएस अधिकारी तारीक थॉमस यांना नगर विकास खात्यात संचालकपदी पाठवले आहे तर शशांक त्रिपाठी यांची पणजी महापालिका आयुक्तपदी बदली केलेली आहे.लेविन्सन मार्टिन्स यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या संचालकपदाचा तसेच घन कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा राहील. आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी - १ या पदाचा ताबा राहील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अधिकारी आपापल्या पूर्वीच्या पदांवर रुजू होतील. कार्मिक खात्याचे अवर सचिव हरिश अडकोणकर यांनी बुधवारी हा आदेश काढला. दरम्यान, काही उपजिल्हाधिकारी आणि संयुक्त मामलेदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक यांना मुरगांवहून फोंड्यात, साईश नाईक यांना फोंड्याहून मुरगांवला, प्रवीण गांवस यांना उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात मामलेदारपदी तर अर्चना फातर्पेकर यांना दक्षता खात्यात पाठवले आहे.उपजिल्हाधिकारी विशाल कुडाळकर यांना सत्तरीत, विवेक नाईक यांना बार्देस कोमुनिदाद प्रशासकपदी, आयपीएस अधिकारी विवेक पी. एच. यांना तिसवाडीत, सचिन देसाई यांना डिचोलीत, सगुण गावडे यांना उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात, कबीर शिरगांवकर यांना बार्देस उपजिल्हाधिकारी -२ या पदी, राजू रघुनाथ देसाई यांना सासष्टी उपजिल्हाधिकारीपदी, स्नेहल प्रभू यांना दक्षिण उपजिल्हाधिकारी (भू संपादन), परेश फळदेसाई यांना मुरगांव उपजिल्हाधिकारीपदी तर महादेव आरोंदेकर यांना दक्षिण उपजिल्हाधिकारी (महसूल) या पदी पाठवले आहे.
गोव्यात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 7:44 PM