मडगाव: गोव्यात रेल्वे दुपदरी करणाला लोकाकडून विरोध होत असला तरी दक्षिण पश्चिम रेल्वेने मडगाव ते चांदर दरम्यानच्या टप्प्यात या कामाला सुरुवात करण्याचे ठरविले असून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी या कामासाठी रेल विकास निगमला परवानगीही दिली आहे.
चांदर, नेसाय आणि दवर्ली या तीन ठिकाणी रस्ता कापून तो रुंद करण्यासाठी उद्या 28 ऑक्टोबर रोजी नेसाय येथे रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत काम हातात घेण्यात येणार आहे. असेच काम 2 नोव्हेंबर रोजी चांदर ते गिरदोली या भागात तर 9 नोव्हेंबर रोजी रावणफोंड ते दवर्ली या दरम्यान रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम चालू राहणार आहे. त्यावेळी या भागात जी रेल्वे फाटके आहेत ती सर्वसामान्य वाहतुकीला बंद ठेवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेला दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयातूनही ना हरकत दाखला देण्यात आला आहे. हे काम करताना पुरेशी सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
सध्या दक्षिण गोव्यात या दुपदरीकरणाला मोठा विरोध होत असून हे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीला फायदेशीर ठरण्याचा आरोप लोक करत असून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ते रस्त्यावरही उतरले आहेत. हल्लीच मुरगाव उपजिल्हाधिकाऱ्यासमोर होणाऱ्या सुनावणीलाही लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन विरोध केला होता.