पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवरच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसलाही या निवडणुका पक्षीय पातळीवर झालेल्या हव्या आहेत. सरकारने अजून त्याविषयी वेगळा कोणता निर्णय घेतलेला नसला तरी, जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवरच घेण्याची तरतूद कायद्यात आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या गेल्या. काँग्रेसने त्यावेळी विरोध केला होता. तथापि, सरकारने संबंधित कायद्यात दुरुस्ती करून जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या होत्या. काँग्रेसने त्यावेळी निषेध म्हणून जिल्हा पंचायत निवडणुकीत भाग घेतला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसने उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले, की जिल्हा पंचायत निवडणुका येत्या मार्चच्या दुस-या पंधरवड्यात होऊ शकतात. त्या पक्षीय पातळीवर घ्याव्यात की घेऊ नयेत हे अजून ठरलेले नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोग जाहीर करील पण आम्ही निवडणुकीला कधी सामोरे जाऊ शकतो हे आम्ही आयोगाला कळवले आहे.निवडणुका पुढे ढकला : मगोपदरम्यान, मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुका मार्चनंतर घ्या किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच घ्या अशी मागणी केली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्च महिन्यातही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. त्यामुळे त्या काळात व्यत्यय नको. त्यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुका मार्च महिन्यात घेण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी फेरविचार करावा, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे.