पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आखाड्यास आता युद्धभूमीचे रूप प्राप्त झाले आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते निवडणुकीनिमित्त बंडखोरी करू लागले आहेत. काही मंत्री आणि सर्व पक्षांचे आमदार आता घरोघर फिरून आपण रिंगणात उतरविलेल्या उमेदवारासाठी मते मागू लागले आहेत. येत्या १८ रोजी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या प्रत्येक मंत्र्याने व विविध पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांनी आपापल्या मतदारसंघातच तळ ठोकला आहे. काही मंत्री व आमदार घरोघर फिरू लागले आहेत. विधानसभेची सेमी फायनलच आल्याप्रमाणे मंत्री व आमदार जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचार कामात मग्न झाले आहेत. अपक्ष आमदार नरेश सावळ, रोहन खंवटे, मंत्री दिलीप परुळेकर, महादेव नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर, पांडुरंग मडकईकर, मिकी पाशेको आदींनी तर जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचार कामात स्वत:ला झोकूनच दिले आहे. भाजप-मगो-गोवा विकास पक्षाने युतीचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, तर काँग्रेसच्या आमदारांनी स्वत:च्या व्यक्तिगत स्तरावर उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहेत. काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांनी अनेक मतदारसंघांत बंडखोरी केली आहे. पेडण्यात मगो पक्षात बंडखोरी झाली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शनिवार हा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत एकूण २०५ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. गुरुवारी ६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात ४५ अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत. गुरुवारी उत्तर गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांतून ३१ आणि दक्षिण गोव्यातून ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. रविवारी अर्जांची छाननी होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत आहे. (खास प्रतिनिधी)
जि. पं. निवडणूक आखाड्यास युद्धभूमीचे रूप
By admin | Published: March 06, 2015 1:18 AM