पणजी : गॅस अथोरिटी ऑफ इंडिया (गेल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्परेरेशन लिमिटेडतर्फे नैसर्गिक वायूची वाहिनी टाकण्याचे काम अखेर दोनापावल आणि करंजाळेच्या भागात सुरू झाले आहे. पणजी महापालिकेने ब-याच प्रतीक्षेनंतर गेल व भारत पेट्रोलियमच्या ह्या प्रकल्पाची वाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता दोनापावल- करंजाळेच्या पट्टय़ात वाहिनी टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
पणजी महापालिकेकडून अगोदर या प्रकल्पासाठी परवानगीच मिळत नव्हती. महापालिका आयुक्तपदी आयएएस अधिकारी आल्यानंतर परवानगी मिळाली. त्यामुळे आता दोनापावल भागात काम सुरू झाले आहे. सध्या फक्त सहा किलोमीटरची वायूवाहिनी पणजीत टाकण्यासाठी परवानगी मिळाली आहे. काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतात. ते फोडून तिथे वायूवाहिनी टाकण्यासाठी बांधकाम खात्याकडून परवानगी गेलने मागितली आहे. ती मिळालेली नाही. मडकईहून पणजीत वायू आणला जाणार आहे. पूर्वी बांबोळीहून वायूवाहिनी आणण्याचा प्रस्ताव होता पण बांधकाम खात्याने त्यासाठी परवानगी न दिल्याने मार्गात बदल केला गेला. पणजीत उपकेंद्र बांधण्याची गेलची योजना आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे संबंधितांनी जमीन मागितली आहे.
स्वयंपाकाचा गॅस व औद्योगिक वापरासाठीचा गॅस या वाहिनीद्वारे उपलब्ध करण्याची योजना आहे. घरोघर जोडण्या देऊन हा वायू पोहचविण्याचा गोव्याच्या विविध भागांतील हा प्रकल्प एकूण 119 कोटी रुपयांचा आहे. कुंडई, फोंडा आदी भागांमध्ये काम झाले आहे. डिचोली तालुक्यातील कुडचिरे भागातून ही वाहिनी खांडोळा, माशेलमार्गे कुंडई व तिथून फोंडय़ात पोहचली आहे. पणजीला मडकईहून वायू आणताना खूप कसरती कराव्या लागतील. त्यासाठी बरेच काम करावे लागेल, कारण मध्ये नदी, नाले, पुल वगैरे येतात, असे एका अधिका:याने सांगितले. घरगुती वापरासह व्यवसायिक आस्थापनांनाही या वायूचा लाभ होणार आहे. काही उद्योगांनी या वायूसाठी प्रतीक्षा केली आहे.
गोव्याची वायूवाहिनी ही दाबोळ-बंगळुर वायूवाहिनीला जोडली जाणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापुर जिल्ह्यांसह ही वायूवाहिनी बेळगाव, धारवाड, हवेरी आदी भागांत जाते. जमिनीखालून जाणा:या या वायूवाहिनीला प्रथम गोव्यातील काही भागांत विरोध झाला होता व त्यामुळे कामाला विलंब झाला होता. डिचोलीतील कुडचिरे येथे या वाहिनीचे वाल्व स्टेशन आहे.