पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत. उद्या मंगळवारी नरक चतुर्दशी अर्थात दिपावलीच्या दिवशी पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येतील.
खात्याचे संचालक आयएएस अधिकारी रवी झा यांनी ही अधिसूचना काढली आहे. बुधवार दि. ७ लक्ष्मीपूजन व गुरु वार दि. ८ रोजी बली प्रतिपदेला रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडता येतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्थानकावरील प्रमुखांची असेल त्यामुळे वरील वेळेव्यतिरिक्त फटाक्यांचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांची निर्मिती, वितरण आणि वापरावर निर्बंध घातलेले आहेत. दिवाळी सणात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे आवाजाचे प्रदूषण तर होतेच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीनिमित्त केवळ दोन तास फटाके फोडण्यास मुभा दिली आहे हे दोन तास राज्य सरकारने निश्चित केले आहेत.
गोव्यात नरकासूर प्रतिमा तयार करुन दिपावलीच्या पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. अशा हजारो नरकासूर प्रतिमा राज्यभर तयार केल्या जातात. लहान मुलांपासून मोठमोठी मंडळे नरकासूर प्रतिमा तयार करतात. प्रमुख शहरांमध्ये पहाटेपर्यंत नरकासूर स्पर्धाही घेतल्या जातात. दहनाच्यावेळी
फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अभ्यंगस्नानानंतरही फटाके फोडण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या काळात कुठले दोन तास फटाके वापरण्यास द्यावेत याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे कोर्टाने म्हटले होते. त्या अनुषंगाने वरील अधिसूचना काढण्यात आली आहे.