लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिवाळीनिमित्त बाजारात फराळ दाखल झाला आहे. महिला स्वयंसहाय्यता गटांकडून हा फराळ तयार केला जात असून, त्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. यात लाडू, चिवडा, शंकरपाळी आदीचा समावेश आहे.
पूर्वीच्या काळी दिवाळीला काही दिवस असताना घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जायचे. मात्र, आता अनेक महिला नोकरी व व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना फराळ तयार करण्यास वेळ मिळत नसल्याने अनेकजणी रेडिमेड फराळाला प्राधान्य देतात. बाजारातून तसेच महिला स्वयंसहाय्यता गटांकडून त्या हा फराळ खरेदी करतात.
दिवाळीला काहीच दिवस शिल्लक असल्याने सध्या महिला स्वयंसहाय्यता गट फराळ तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. गावठी चकली, शंकरपाळी, बेसन, रवा, मूग आदीपासून तयार केलेले लाडू, खोबऱ्याच्या वड्या, चणाडाळीच्या वड्या, पोह्याचा तिखड, गोड चिवडा, चुरमा, शेव आदी फराळाचा यात समावेश आहे. या सर्वाच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.
आपल्या गरजेनुसार लोक त्यांना ऑर्डर देत आहेत. साधारणतः पाव किलो, अर्धा किलो व एक किलो असे हे पदार्थ मिळत असून, त्यांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी लगबग दिसू लागली आहे. पुढील काही दिवसांत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे.