पणजी: मागील ३ वर्षे प्रलंबित असलेली प्राथमिक शिक्षकांची भरती शेवटी मार्गी लागली आहे. शिक्षण खात्याकडून १२० प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी इच्छापत्रे दिली असून वैद्यकीय तपासणीनंतर शिक्षक नियुक्तही होणार आहेत. १४२ शिक्षकांसाठी शिक्षण खात्याने ३ वर्षांपूर्वी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यात इतर मागास वर्गीयांसाठी २९ पदे, अनुसूचित जमातीसाठी ४० पदे, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांसाठी १४ पदे, शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी ७ पदे, आणि राखिवता नसलेली ५० पदे होती. यातील शारीरिक दृष्ट्या अपंगासाठीची ७ आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांसाठीची १४ पदांसाठीची भरती राहिली आहे. इतर पदांसाठी इच्छापत्रे पाठविण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण खात्याला उमेदवारांकडून या इच्छापत्रांसाठी स्विकृती दर्शविणे आवश्यक आहे.
ही शिक्षक भरती ३ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली असली तरी मध्यंतरी दोन वेळा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे ती रखडली होती. तसेच लेखी परीक्षा झाल्यानंतर निकालही उशिरा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष नियुक्तीसाठी विलंब लागला.
नियुक्तीनंतर सर्व शिक्षकांना सक्तीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभुमीवर नियुक्ती झाल्यामुळे दिवाळीची सु्ट्टी संपल्यानंतर द्वितीय सत्रात नवीन शिक्षक उपलब्ध होणार आहेत.