पणजी : प्राप्तीकर चुकविण्याचा ठपका ठेऊन तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे खासदार एस जगथरक्षकन यांच्या मालकीच्या गोव्यातील आसथापनांवर गुरूवारी आयकर खात्याकडून छापे टाकण्यात आले. खासदार जगथरक्षकन यांच्या मालकीचे कुंकळ्ळी येथे फॉर्च्युन डिस्टीलर्स अँड विंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड नामक आस्थापन आहे. या आस्थापनावर पहाटे हा छापा टाकण्यात आला. दिवसभर छापा सुरू होता. कंपनीवर प्राप्तीकर चुकविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्या प्रकरणाच्या तपासासाठी हा छापा होता अशी माहिती आयकर खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान एस जगथरक्षकन याच्या गोव्यातीलच नव्हे तर देशभरातील एकूण ४० आस्थापनांवर छापे टाकण्यात आल्याचे वृत्त राष्ट्रीय वाहिनांनी दिले आहे. जगथरक्षकन हे माजी केंद्रीय मंत्री असून ते मोठे उद्योजकही आहेत. तामिळनाडूच्या अरक्कोनम जिल्ह्याचे खासदार आहेत. ईडीकडून द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांची ८९ कोटी रुपयांची मालमत्ता तीन वर्षांपूर्वी जप्त केलेली होती. मात्र मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देताना त्यांच्यावरील कर चुकवेगिरीचे आरोप रद्दबातल ठरविले होते.