पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर येत्या २५ रोजी विधानसभेत २०१५-१६ सालासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पार्सेकर यांनी आपण सर्वसामान्य गरीब माणसांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकणार नाही, असे सोमवारी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्प हा पूर्णपणे रोजगारनिर्मितीवरच भर देईल. सुशिक्षित बेकारांची संख्या वाढू नये म्हणून आम्ही रोजगारनिर्मितीवरच भर देऊ. सर्र्वसामान्यांसाठी अतिरिक्त कर लागू केले जाणार नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाशी सर्वसाधारणपणे साधर्म्य साधू शकेल असा हा अर्थसंकल्प असेल. दरम्यान, विधिमंडळ कामकाज समितीची सोमवारी बैठक झाली. सभापती राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री पार्सेकर, मंत्री सुदिन ढवळीकर आदी बैठकीस उपस्थित होते. त्या वेळी अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यात आले. येत्या दि. २३ पासून पाच दिवसांचे अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. एकूण ७४० तारांकित व अतारांकित प्रश्न अधिवेशनावेळी चर्चेस येतील. काही सरकारी विधेयकेही मांडली जाणार आहेत. पहिल्या दिवशी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण होईल. (खास प्रतिनिधी)
गरिबांवर करांचा बोजा टाकणार नाही!
By admin | Published: March 10, 2015 1:33 AM