किशोर कुबल, पणजी : ‘पोर्तुगिजांना मी सलाम करतो’, या विधानामुळे वादग्रस्त ठरलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असलेल्या गोवेकरांचे भारतीय पासपोर्ट रद्द केले जाऊ नयेत, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवणार आहेत.
आपल्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला असून पोर्तुगीज पासपोर्ट मिळाल्यानेच ७० टक्के गोवेकर सुखी झाल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे.प्रसार माध्यमाकडे बोलताना चर्चिल म्हणाले की, गोमंतकीयानी नोकरी,धंद्यासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये जाण्यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेला आहे. हे लोक आज चांगली कमाई करुन सुखी आहेत. पोर्तुगिजांनी १९६१ पूर्वी गोव्यात जन्मलेल्यांना पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारण्याची संधी दिली. त्यामुळे गोवेकरांचे भलेच झाले.
चर्चिल म्हणाले की,‘ पोर्तुगिज पासपोर्ट घेतला म्हणून गोवेकर काही पोर्तुगालला जाऊन मतदान करणार नाही. ते गोव्यातच मतदान करतील. या लोकांना सरकारने हवे तर ओसीआय कार्ड द्यावे. मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडेही बोललो आहे.’
दरम्यान, ‘पोर्तुगिजांना मी सलाम करतो’, असे जे विधान चर्चिल यांनी केले होते त्यावरुन गोव्यात बराच वाद झाला. चर्चिलना पोर्तुगालला हाकला, अशा संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या.