सेक्स स्कँडलचा आरोप करताना आपण कुठल्याच मंत्र्याचे नाव घेतले नव्हते, असा दावा काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. गिरीशने दोन वर्षांपूर्वी मिलिंद नाईक यांच्यावर सेक्स स्कैंडलचा आरोप केला होता. त्यावेळी गिरीश व संकल्प आमोणकर या दोघांनीही मिलिंदचे थेट नाव घेतले होते. शिवाय काही फोटोही जारी केले होते. पुढे मिलिंद नाईक यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिलिंदला लोकांनी घरी बसवले. सरकारमधील काही राजकारण्यांनी यापासून बोध घेतलेला दिसत नाही.
गिरीश चोडणकर यांनी यावेळी फार्महाउसमधील एका घटनेचा संदर्भ दिला आहे. एका मंत्र्याने रात्रीच्यावेळी फार्महाउसवर महिलेला बोलावून गैरवर्तन केले, अशी माहिती गिरीशने सांगितली; मात्र तसे काही घडलेच नव्हते असे एका महिलेने व तिच्या पतीने पुढे येत दोन दिवसांनी जाहीर केले. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, कोणत्याच महिलेची बदनामी करण्याचा अधिकार कुणालाच नाही. जे लोक मंत्र्यासोबतचे विवाहित महिलांचे फोटो व्हायरल करतात, ते विकृतीने पछाडलेले आहेत. संबंधित मंत्र्याने गैरवर्तन केले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासही केलेला नाही. गैरवर्तनाचा आरोप खरा आहे, असे मानण्याएवढे पुरावेही आलेले नाहीत. संबंधित महिलेचीही तक्रार नाही. मग इतरांनी प्रचंड बाऊ का करायचा? गिरीशने कुणाचे नाव घेतलेले नाही. कोणत्याच पंच महिलेचे किंवा मंत्र्याचेही नाही. मग मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयाने तो आरोप माविनवरच आहे. असा कांगावा का करावा?
जी काही आरोपबाजी झाली, त्याची चौकशी पोलिस निश्चितच करू शकतात. फार्महाउसवर रात्रीच्यावेळी महिलेशी निगडित वाद झाला होता का, त्या वादानंतर कुणा मंत्र्याने पोलिसांना बोलावले होते का, कुणा युवकाला नंतर ताब्यात घेतले गेले का, अशा प्रश्नांच्या अनुषंगाने चौकशी करता येईल. कुणा महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असा दावा गिरीश करत असतील तर चौकशी होऊन जाऊ द्या. कदाचित आरोप खोटाही असेल, पण चौकशी केल्यानंतरच ते स्पष्ट होईल; मात्र कोणा महिलेचे जुने फोटो व्हायरल करून किंवा तिचा भलत्याच घटनेशी संबंध जोडून कुणीही सोशल मीडियावर बदनामी करू नये. पोलिसांनी चौकशी अवश्य करावी. काही तथ्य असेल तर राजकारणी मोकळे सुटू नयेत. मंत्री माविन यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने अगोदरच आपल्यावर हा आरोप घ्यायला नको होता. पोलिसांनी चौकशी करून काय ते शोधून काढले असते. येथे विषय माविनचा नाही पण काळ सोकावतोय. काही राजकारण्यांना पैसा व सत्तेची धुंदी चढलेली आहे.
विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात विरोधी सात आमदारांनी सावंत सरकारचे वाभाडे काढले. सरकारी भ्रष्टाचार हा एक मुद्दा झाला पण राजकारण्यांचे वर्तन हा दुसरा मुद्दा आहे. लोकांना सत्य काय ते कळते. काही मंत्री, आमदार किंवा महामंडळांचे चेअरमन यांना सत्तेची एवढी नशा चढलीय की ते चुकीच्या पद्धतीने वागू लागले आहेत. चांगले सदरे व सोबत गजरेही हवेत, ही काही आमदारांची जीवनशैली झालेली आहे.सेक्स स्कँडलमध्ये कोणता मंत्री गुंतला आहे अशी विचारणा चोडणकर यांनी केली. यावरून राज्यात जी चर्चा सुरू झाली, त्यावरून लोकांमधील राजकारण्यांप्रतीचा रागही कळून येतो.
गोव्यात किंवा देशात राजकारण्यांच्या भानगडी अनेक आहेत. २०१० साली मिकी पाशेको यांच्यावर नादिया तोरादो या महिलेचे प्रकरण शेकले होते. तिने आत्महत्या केल्यानंतर मिकीला तुरुंगात जावे लागले होते. मिकी त्यावेळी मंत्री होते. गोव्याला एक-एक पराक्रमी मंत्री, आमदार लाभलेले आहेत. भारतीय समाजमन महिलांशी निगडित राजकीय नेत्यांचे गैरवर्तन सहन करत नाही. ८० च्या दशकात सभापतींचे विनयभंग प्रकरण गाजले होते. २०१४ साली हरयाणामध्ये गोपाळ कांडा या मंत्र्याला एका हवाईसुंदरीच्या आत्महत्येनंतर अटक झाली होती. सप्टेंबर २०१६ मध्ये दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी संदीप कुमार नावाच्या मंत्र्याची सेक्स स्कैंडलप्रश्नी हकालपट्टी केली होती. गोव्याच्या राजकारण्यांनी शहाणे व्हावे. काहीजण ताजमहाल तर काहीजण फार्महाउसमध्ये रमले आहेत. पोर्तुगीज राजवटीच्या खुणा पुसण्यापूर्वी भानगडबाज राजकारण्यांच्या खुणा पुसलेल्या बऱ्या, असे महिलांना देखील वाटते.