पणजी, दि. 18 - गोव्यात किनारी पर्यटनासाठी पुढील चार दिवस प्लॅन केला असेल तर एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे पुढील ९६ तास समुद्रस्नान करता येणार नाही किंवा जलक्रीडांमध्येही भाग घेता येणार नाही. गोव्यातील किना-यांवर जीवक्षकाचे काम करणा-या दृष्टी लाइफ सेविंग कंपनीने तसा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने चार दिवस मुसळधार पावसाचा व्यक्त केलेला अंदाज या पार्श्वभूमीवर हा इशारा स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना देण्यात आलेला आहे. किना-यांवर ठिकठिकाणी लाल बावटे फडकावले आहेत. कंपनीचे सरव्यवस्थापक (आॅपरेशन्स) पी. एन. पांडे यांनी पुढील ९६ तास समुद्रात स्नानासाठी किंवा अन्य जलक्रीडांसाठी उतरणे स्थानिक तसेच पर्यटकांनी टाळावे, असे म्हटले आहे. खराब हवामानात एखादी दुर्घटना घडलीच तर जीवरक्षकांनी सर्व सज्जता ठेवली आहे, असेही ते म्हणतात.
हवामान खात्याने पावसाच्या बाबतीत ‘रेड अलर्ट’ दिला होता. गुरुवार २१ पर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर वरील अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. समुद्रात उतरु नये तसेच कोणत्याही जलक्रीडा करु नये, असे सक्तपणे बजावले आहे. गोव्याच्या किना-यावर ६00 हून अधिक जीवरक्षक तैनात आहेत. पावसामुळे भरती आहे आणि खराब हवामानामुळे प्रचंड लाटाही उसळत आहेत. जून ते सप्टेंबरपर्यंत समुद्रात जलक्रिडांसाठी बंदी असते. गेले काही दिवस हवामान चांगले होते त्यामुळे किना-यांवर जलक्रिडा सुरुही झाल्या होत्या.
अनेकदा परराज्यातून आलेले पर्यटक दारुच्या नशेत समुद्रात उतरतात आणि दुर्घटना घडतात. जीवरक्षकांचा इशारा धुडकावून पर्यटक समुद्रात उतरतात. सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास मनाई आहे. याबाबत कायदा आणखी कडक केला जाणार आहे.