पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी आम्हालाही चिंता असून ते लवकर बरे व्हावे असे वाटते. मात्र सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असताना देखील मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी सरकारकडून काहीच माहिती दिली जात नाही. अधिकृतरित्या सरकारने निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी बुधवारी येथे केली.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या उपस्थितीत विधानसभा प्रकल्पातील विरोधी पक्षाच्या लॉबीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले, की पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी सरकारने लपवाछपवी करू नये. जी काही माहिती आहे ती जाहीर करावी. विधानसभा अधिवेशनाचा कालावधी अगोदरच कमी करण्यात आला. आम्ही त्यासाठी सहकार्य केले. विधानसभा अधिवेशन सुरू असताना तरी, सरकारने मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी वैद्यकीय निवेदन जारी करणे गरजेचे आहे. आम्हाला काहीच माहिती दिली जात नाही. आम्ही विधानसभेतही हा विषय उपस्थित करणार आहोत व पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची माहिती देण्याचा आग्रह धरू.
न्यायालयात जाणार - आयरिश
सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनीही मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याविषयी जनतेला माहिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी विविध प्रकारची वृत्ते येत आहेत. संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने माहिती जारी करावी. पर्रीकर हे स्वत: व्हिडिओद्वारेही संवाद करून स्वत:च्या आरोग्याविषयीची माहिती गोव्यातील लोकांमार्फत पोहचवू शकतात. तशी व्यवस्था केली जावी, असे रॉड्रीग्ज यांनी म्हटले आहे. पर्रीकर हे आमच्या पणजी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आरोग्याविषयीची खरी माहिती सार्वजनिक केली जावी अशी सूचना न्यायालयाकडून प्रशासनाला दिली जावी म्हणून आपण येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर याचिका सादर करणार असल्याचे व्यवसायाने वकील असलेल्या रॉड्रीग्ज यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पर्रीकर यांच्यावर मुंबई येथील लिलावती इस्पितळामध्ये अजुनही उपचार सुरू आहेत. गेले आठवडाभर ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. त्यांना सौम्य पॅनक्रियाटीटीस झाला असल्याचे प्रथम भाजपच्या माजी आमदाराकडून जाहीर करण्यात आले होते. पर्रीकर हे उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे निवेदन लिलावती इस्पितळाने विविध चर्चाच्या पाश्र्वभूमीवर अलिकडेच जारी केले होते. पर्रीकर यांना गरज पडल्यास प्रसंगी अमेरिकेतही उपचारांसाठी नेले जाईल, असे यापूर्वी उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले आहे.