लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म हा मंत्र घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली वाटचाल केली. म्हणूनच ते जाऊन शेकडो वर्षे झाली तरीही लोक, आठवावे त्यांचे रूप, आठवावा त्यांचा प्रताप हे वाक्य अभिमानाने उच्चारतात. गोव्यात महाराजांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु, नुसते पुतळे उभारून चालणार नाही तर महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फर्मागुढी येथे काल, सोमवारी शासकीय शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या सोहळ्यास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कृषी मंत्री रवी नाईक, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, मुख्य वक्ते डॉ. सागर देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना ताठ मानेने जगायला शिकवले. आजच्या युवकांनी त्यांचा इतिहास सखोलपणे अभ्यास केल्यास नुसत्या त्यांच्या नावानेच तुमच्यामधील रक्त सळसळायला लागेल. परंतु आमची आजची पिढी शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली असतानासुद्धा त्यांना जगण्याची दिशा सापडत नाही. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने शिवचरित्राचे वाचन करावे. यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर, प्रमुख वक्ते शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. सागर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
महाराजांच्या दुरदृष्टीचे धडे घ्या
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते, म्हणूनच त्याकाळी अकल्पनीय अशा गोष्टी त्यांनी राज्य करताना अंमलात आणल्या, ज्या आज आम्ही तंत्रज्ञान म्हणून मिरवत आहोत. त्या त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने, प्राप्त परिस्थितीनुसार व मोजक्या साधन सुविधांनिशी निर्माण केल्या होत्या. त्यांचे तंत्रज्ञान एवढे प्रगत होते की त्या तंत्रज्ञानाच्या जीवावरच अख्ख्या जगात ते बलाढ्य राजे म्हणून मानले जात होते.