पणजी: विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम कार्यक्रमात बोलताना सांगितले.सह्त्रबुद्धे यांनी सांगितले की अवघ्या काही वर्षांचा काळ हा गुलामीत गेला याचा अर्थ हजारो वर्षांचा इतिहास असलेला आपला देश हा सदाकाळ गुलाम नव्हता. आपला देश हा खूप विकसित होता. अपल्या देशामधील नालंदा सारख्या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी विदेशातून लोकांचा या देशात ओघ सुरू होता. अक्रमकांनी नंतर नालंदा विद्यापीठ नष्ट केले आणि तेथील समृद्ध वाचनालयही जाळून टाकले हा इतिहास जेव्हा आपल्याला ठाऊक आहे तेव्हा विकासासाठी पश्चिमेला डोळे लावून राहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हिंदुत्वाची आणि पर्यायाने भारतियत्वाची जाणीव ठेवली तरी पुरे असे त्यांनी सांगितले.संपूर्ण जगात भारत हा असा देश आहे की ज्या देशाने कधीच कुणावर आक्रमण नाही केले. मानवतावादाची मूल्ल्ये भारताने जपली आहेत. वसुधैव कुटुंबकम हा संदेशभारताने जगाला दिला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक संशोधने भारतात झालेली आहेत. त्यामुळे आपण इत राष्ट्रांपेक्षा कमी प्रगत असल्याचा न्यूनगंड कधीही ठेवता कामा नये असे त्यांनी सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या शब्दात विकासाची संकल्पना सांगायचे झाल्यास आपल्याला नालंदाचे गतवैभव प्राप्त करावयाचे आहे असे ते म्हणाले.हेडगेवार विद्यालयाच्या मळा - पणजी येथील विद्यालयासमोरच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विभाग कार्यवाह नाना बेहरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल सावंत उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक आणि नागरिकही उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे कार्यक्रमाला पूर्ण गणवेशात उपस्थित होते.
विकासासाठी पश्चिमेकडे डोळे नकोत: सहस्त्रबुद्धे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 8:48 PM