लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्याचा चौफेर विकास हेच सरकारचे ध्येय आहे. विकास करत असताना प्रत्येक गावाचा विचार केला जात आहे. नवनव्या प्रकल्पांमुळेच गावाचा व पर्यायाने गोव्याचा विकास होणार आहे. त्यामुळे नव्या प्रकल्पांना विरोध करू नका, त्यांचे स्वागत करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
आदिवासी कल्याण संचालनालयातर्फे आयोजित बाणस्तारी मार्केट प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, भोम पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक, माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्या उपस्थितीत नव्याने बांधण्यात आलेल्या बाणस्तारी बाजाराचे लोकार्पण उपस्थितीत झाले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, चंद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर उतरवून भारताने जगाला प्रभावित केले आहे. विकासाच्या बाबतीत भारत कुठे आहे, हे आम्ही लोकांना दाखवून दिले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास होत असताना सामान्य लोकांचा विकास सुद्धा आम्हाला घडवून आणायचा आहे. ज्यावेळी सामान्यातल्या सामान्य लोकांची प्रगती होईल, त्याचवेळी सुशासनचे स्वप्न पूर्णत्वास येईल. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सरकार ज्यावेळी लोकार्पण करते त्यावेळी त्या प्रकल्पाची निगा व काळजी घेण्याची जबाबदारी ही नागरिकांनी पेलायला हवी.
१८ कोटींचा प्रकल्प
१८ कोटी खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अख्या भारतात या प्रकारचा प्रकल्प पंचायत स्तरावर तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी बांधलेला आहे. शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा. येथे कोल्ड स्टोरेज, मलनिस्सारण प्रकल्प सुद्धा बांधून घेण्यात आला आहे.
चतुर्थीपूर्वी वचनपूर्ती
क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले की, प्रकल्प राबवत असताना विरोध होत राहणारच. परंतु प्रत्येकवेळी आम्ही लोकांच्या शंकांचे निरसन केले आहे. चर्चेअंती अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. बाणस्तारी मार्केट प्रकल्प हे एक मोठे स्वप्न होते जे आज पूर्णत्वास येत आहे. वचन दिल्याप्रमाणे चतुर्थीच्या अगोदर आम्ही हा प्रकल्प लोकांच्या सेवेसाठी खुला केला आहे