लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी म्हापशात घेतली. स्वस्थ बसू नका, कामाला लागा. महिला झेंडपींनो, नेतृत्वगुण दाखवा, असे आवाहन त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केले. उमेदवार निवडून येईल म्हणून कोणी आरामात राहू नये, यावेळी जास्त मताधिक्य मिळायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, 'प्रत्येक झेडपी सरासरी २० हजार मतदारसंख्या असलेल्या जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून आलेला आहे. आमदारांपाठोपाठ झेडपींचीही लोकसभा उमेदवारासाठी काम करणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच तुम्ही स्वतः केलेली विकासकामे घेऊन लोकांपर्यंत जा. आमच्या उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळायला हवीत या दृष्टिकोनातून जोमाने कामाला लागा. लोकांनी जर काही विषय मांडले, तर त्यांचे शंकानिरसन करा. समस्या सोडविण्याचे प्रयत्न करा', असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'मतदारसंघ मोठा असल्याने उमेदवार सर्वत्र पोहोचू शकणार नाही. त्यामुळे आमदार, झेडपी, पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींना लोकांपर्यंत पोहोचावे लागेल.' पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, कोअर कमिटीचे सदस्य दत्तप्रसाद खोलकर बैठकीला उपस्थित होते. जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर यांनी आभार मानले.