लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : 'लोक सेवा हीच खरी पोलिसांची सेवा' असायला हवी. त्यासाठी कोणत्याही संकटांना तोंड देण्याची क्षमता पोलिसांमध्ये असणे आवश्यक आहे. पोलिसांनी चांगले काम करावे. त्यांनी कधीच आपल्या खाकी वर्दीला डाग लावू देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.
गोवा पोलिस खात्याच्या सर्व श्रेणी विभागाच्या ४९ व्या तुकडीच्या पोलिस कॉन्स्टेबल यांचा दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर रविवारी सकाळी हा दिक्षांत सोहळा पार पडला. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पोलिस अधीक्षक सुचिता देसाई यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांचे शिक्षण कमी आहे त्यांनी देखील पुढे शिक्षण घेतल्यास बढतीची संधी मिळेल. पोलिसांनी वर्दीचा नेहमीच मान, सन्मान ठेवला पाहिजे. सेवा काळात कोणाताही काळा डाग लागणार नाही याची नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे. बदनामी होणार नाही याची काळजी घेऊन पोलिस विभागाची शान राखली पाहिजे, न डगमगता काम करावे व छाती पुढे करुन ताठ मानेने कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी देश, राज्य सेवेसाठी कटीबध्द राहून लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे असे सावंत म्हणाले. पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
आज पोलिस विभागात ४७३ पोलिस भरती झालेले आहेत. यामध्ये दहावीपासून उच्च शिक्षितांचा समावेश आहे. अशांना येणाऱ्या काळात सेवेत पुढील पद मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी स्वतःला सिध्द करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यांचा सन्मान...
यावेळी संजय वरक, ऐश्वर्या नाईक, रुषिकेश शेट, सौरभ नाईक, आत्माराम पोळे, केदार च्यारी यांना इन डोअर, आऊट डोअर विभागातून तर बेस्ट ऑल राऊंडर म्हणून संजय वरक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सुव्रनिवेदन अमिता नाईक यांनी केले. प्रशिक्षणार्थीना शपथ प्राचार्य सुचिता देसाई यांनी दिली.
राज्यात पर्यटकांना सुरक्षितता द्या...
गोव्याचा पर्यटन उद्योग बहरत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत. या पर्यटकांना सुरक्षित गोव्याची सफर घडविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस सेवेत काम करत असताना पर्यटकांना सहकार्य करा, तेव्हाच गोव्याची प्रतिमा आणखी मोठी होईल. पोलिस दलात काम करताना गोमंतकीयांची मान उंचावेल याच दृष्टीने प्रयल करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.