लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राजकीय फायदा मिळवण्यासाठी माझ्या भाषणातील निवडक शब्द फिरवण्याचा मुख्यमंत्री सावंत प्रयत्न करीत आहेत, असा दावा काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी काल केला.
मी जे बोललो, त्यावर खुल्या चर्चेसाठी मी तयार आहे. परंतु, त्याचवेळी गोव्याची ओळख नष्ट करणे, बेरोजगारी वाढणे, महागाई, गुन्हे आणि भाजप सरकारमधील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरही खुल्या चर्चेसाठी तुमची तयारी दाखवा, असे विरियातो म्हणाले. भारतीय राज्यघटना गोमंतकीयांवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने केलेल्या वक्तव्यामुळे मी हैराण झालो आहे, अशी पोस्ट समाजमाध्यमांवर टाकल्याबद्दल कॅप्टन विरियातो यांना काल प्रत्युत्तर दिले. माझ्या वक्तव्याचा सोयीस्कर अर्थ लावून राजकीय पोळी भाजू नका, असा सल्ला कॅप्टन विरियातो यांनी भाजपला दिला आहे.
मी काय बोललो, कुठे बोललो, कोणत्या संदर्भात बोललो, सर्व काही जनतेसमोर आहे. जेव्हा भाजपवाले मूळ मुद्द्यांवर कात्रीत सापडतात, तेव्हा ते लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात. मी खुल्या चर्चेला सामोरे जाण्यासाठी आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, असे कॅप्टन विरियातो म्हणाले.
मी भाजप राजवटीत झालेली संविधानाची हत्या, भ्रष्टाचार, महागाई, सामूहिक पक्षांतर, बेरोजगारी, गुन्हेगारी, महिला आणि बालकांवरील अत्याचार, गेल्या १० वर्षांत भाजपच्या राजवटीत झालेला पर्यावरणाचा हास आणि गोव्यातील इतर सर्व मुद्द्यांवर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ मेपूर्वी तारीख, वेळ आणि स्थळ निश्चित करावे, असे कॅप्टन विरियातो म्हणाले. मला मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून संविधानाचा आदर करणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे, याचे धडे घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.